चारित्र्य पडताळणीसाठी लाच मागणारा पोलीस नाईक ॲंटीकरप्शनच्या जाळ्यात
By सूरज पाचपिंडे | Updated: September 7, 2022 18:23 IST2022-09-07T18:23:39+5:302022-09-07T18:23:51+5:30
एकूण २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी पंचांसमक्ष केली होती.

चारित्र्य पडताळणीसाठी लाच मागणारा पोलीस नाईक ॲंटीकरप्शनच्या जाळ्यात
उस्मानाबाद : बिअर बार परमिट रूमच्या लायसन्ससाठी आवश्यक असणारी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व स्पॉट पाहणी अहवाल विनात्रुटी पोलीस उप अधीक्षकांकडे सादर करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करणारा भूम पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक ७ सप्टेंबर रोजी ॲंटीकरप्शनच्या जाळ्यात अडकला.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावास बिअर बार परमिट रूम चे लायसन्स काढण्यासाठी चारित्र्य पडताळणी हवी होती. चारित्र्य पडताळणी करुन स्पॉट पाहणी अहवाल विनात्रुटी पोलीस उप अधीक्षक भूम यांना सादर करण्यासाठी पोलीस नाईक गणेश देशपांडे यांनी ११ जुलै रोजी तक्रारदाराकडे स्वत:साठी ५ हजार रुपये व पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्यासाठी २० हजार रुपये अशी एकूण २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी पंचांसमक्ष केली होती.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची डिजिटल व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे पडताळणी करण्यात आली. त्यात पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस नाईक गणेश देशपांडे यांच्याविरुध्द भूम ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई उस्मानाबादलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अंमलदार इफतेकर शेख, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने केली.