धाराशिव : तक्रारदार महिलेच्या मुलाला एका प्रकरणातील गुन्ह्यात मदत करण्यासाठी तब्बल ९५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना पाेलिस निरीक्षकासह महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ करण्यात आली.
एका महिलेने आपल्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत व्हावी, यासाठी पाेलिस निरीक्षक माराेती शेळके याच्याशी संपर्क केला हाेता. चर्चेअंती त्याने महिला पाेलिस कर्मचारी मुक्ता प्रकाश लाेखंडे हिची भेट घेण्यास सांगितले. त्यावर फिर्यादी महिलेने लाेखंडेची भेट घेतली असता, पाेनि शेळके याच्यासाठी लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजाेडीअंती ९५ हजार रूपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केली असता, खात्री झाल्यानंतर बुधवारी ठरल्याप्रमाणे शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा लावला.
यावेळी महिला कर्मचारी लाेखंडे यांना पंचासमक्ष फिर्यादी महिलेकडून सुमारे ९५ हजार रूपये स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. यानंतर पाेनि शेळके तसेच कर्मचारी लाेखंडे या आराेपींना अटक करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता, शेळके याच्याकडून दाेन माेबाईल जप्त करण्यात आले. तर लाेखंडेकडे माेबाईल, दुचाकी, चावी व ओळखपत्र आढळून आले. या प्रकरणी महिला कर्मचारी लाेखंडेविरूद्ध कलम ७, ७ (अ) प्रमाणे, तर पाेनि. शेळके याच्याविरूद्ध रक्कम स्वीकारण्यास प्राेत्साहन दिल्याबद्दल १९८८ चे कलम १२ प्रमाणे आनंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला. सापळा अधिकारी म्हणून पाेलीस उपअधीक्षक याेगेश वेळापुरे तर सहाय्यक सापळा अधिकारी म्हणून पाेनि बाळासाहेब नरवटे यांनी काम पाहिले.