शेतकऱ्यांना मिळणार चाऱ्यासाठी अनुदान
उस्मानाबाद : पशुधन अभियानांतर्गत वैरण बियाणे रोपण, संकलन व वितरण या योजनेखाली अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना सुधारित जातीच्या चारा पिकाच्या बियाणांचे आणि बहुवार्षिक चारा पिकाच्या ठोंबाचे वाटप शंभर टक्के अनुदानावर केले जाणार आहे. यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर टाकले छापे
भूम : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ जानेवारी रोजी ठिकठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाया केल्या. पाथरूड येथे टाकलेल्या छाप्यात दत्तात्रय पवार व संतोष बोराडे हे बसस्थानक परिसरात जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. तसेच भूमनगर परिषद व्यावसायिक संकुलासमोर प्रताप राजारात राऊत, वालवड बस थांबा परिसरात लिंबाजी पाटोळे यांच्यावरही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत.
मास्कचे वाटप
परंडा : येथील कल्याणसागर विद्यालयात नेहरू युवा केंद्र व अंबाजोगाई येथील ग्राम ऊर्जा फाऊंडेशन यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी रामचंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण गरड आदी उपस्थित होते.
कारवाईची मागणी
नळदुर्ग : परिसरात सध्या चोरटी दारू विक्री, मटका, जुगार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तळीरामांमुळे भांडण-तंट्यात वाढ होत असून, या धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
दोघांविरुध्द गुन्हा
उमरगा : येथील अशोक भोला व मलप्पा वगेनोर हे दोघे १२ जानेवारी रोजी मोमीन गल्ली भागात कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख १९९० रुपयांसह पोलीस पथकास मिळून आले. यावरून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्री
मुरूम : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ जानेवारी रोजी दोन ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाया केल्या. चिंचोली येथे महादेव सुरवसे हे त्यांच्या घरासमोर, तर दाळिंब येथे गजानन लवटे हे अवैध गावठी दारूसह मिळून आले.