जादा दराने खत विक्री करून शेतकऱ्यांची लुट; तीन दुकानदारांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 18:31 IST2021-05-21T18:29:28+5:302021-05-21T18:31:46+5:30
जिल्हास्तरीय भरारी पथकाच्या नळदुर्ग व परिसरातील तपासणीत झाले उघड

जादा दराने खत विक्री करून शेतकऱ्यांची लुट; तीन दुकानदारांचे परवाने निलंबित
उस्मानाबाद : रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. तिन्ही दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील श्रावणी ॲग्रो एजन्सीज, नळदुर्ग, श्री समर्थ कृषी सेवा केंद्र, मुर्टा, संघवी शेती उद्योग, नळदुर्ग या खत विक्री केंद्राने खताच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे आढळून आले. त्याअनुषंगाने खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकर्यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र-गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक,दरफलकावर नोंद न करणे यासारखे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही घाटगे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धता व दराबाबत काही अडचण वा तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करता येणार आहे. एवढेच नाही तर फाेनवर तक्रार देता यावी, यासाठी ०२४७२-२२३७९४ हा संपर्क क्रमांक उपलब्ध दिला आहे. या सुविधेचा अन्यायग्रस्त शेतक्यांनी उपयाेग करावा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.