‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या ‘त्या’ भागात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:06+5:302021-09-22T04:36:06+5:30

कळंब : कळंब शहरातील चिकन सेंटरचे वेस्टेज, केशकर्तनालयातील केस, कचरा यामुळे ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या कळंब येडशी रोडवरील त्या ‘स्पॉट’ ...

Plantation in ‘that’ area which became ‘dumping ground’ | ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या ‘त्या’ भागात वृक्षारोपण

‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या ‘त्या’ भागात वृक्षारोपण

कळंब : कळंब शहरातील चिकन सेंटरचे वेस्टेज, केशकर्तनालयातील केस, कचरा यामुळे ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या कळंब येडशी रोडवरील त्या ‘स्पॉट’ वर आता लोकवर्गणीतून मुरूम अस्तरीकरण आणि वृक्षारोपण करण्यात आले.

सजग नागरिकांच्या या कृतीने ‘उकिरड्याची दैना फिटली’ याचीच अनुभूती येत आहे. कळंब शहरातील येडशी रोडवर वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना कळंब नगर परिषद, डिकसळ व तांदूळवाडी ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका बसत होता. कळंब शहरातील चिकन सेंटर चालक आपले वेस्टेज याच रस्त्यावर आणून टाकत होते. केशकर्तनालयातील केस टाकण्याची ही हक्काची जागा बनली होती. याशिवाय घरातील कचरा, टाकाऊ कपडे, मृत जनावरे टाकले जात असल्याने शहरालगतचा हा परिसर ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनला होता. असे असतानाही तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्था याकडे लक्ष देत नव्हत्या. अखेर आपल्याला जाणवत असलेली समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेतला होता. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. तद्नंतर त्यांच्या सूचनेनुसार नागरिक व बांधकाम विभागाने स्वच्छता मोहीम राबवली, तर पुढे स्थानिक नागरिक, हेल्थ ग्रुपचे सदस्य यांनी पुढाकार घेत याठिकाणी सुशोभीकरण, वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार लोकवर्गणी करून अस्वच्छता दूर करून मुरूम अस्तरीकरण भराव मजबूत केला आहे.

याठिकाणी प्रभारी तहसीलदार प्रथमेश भुरके, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि कुमार दराडे, अग्रोजेनिक्सचे संचालक रवी नरहिरे, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ता पवार, आयटीआयचे रवीचंद्र जगदाळे आदींच्या हस्ते कडूनिंब व वटवृक्षाची लागवड करण्यात आली. या लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्यात येणार आहे.

चौकट.............

यांनी घेतला पुढाकार

ग्रामीण भागात एखाद्या अस्वच्छ परिसराचा कायापालट झाल्यास ‘उकिरड्याची दैना फिटली’ असे संबोधले जाते. कळंब शहरातील येडशी रोडवरील ‘डम्पिंग ग्राऊंड’ झालेल्या भागाला स्थानिक नागरिकांनी एकत्र येत अशीच ऊर्जितावस्था आणली आहे. त्यासाठी अशोक डिकले, बापू भंडारे, वैभव कोठावळे, श्रीकांत डिकले, डॉ. पुरुषोत्तम पाटील, बाबा काळे, बाळासाहेब कांबळे, विष्णू मस्के, भाऊसाहेब देशमुख, प्रवीण मडके, विकास भंडारे, सुहास धाबेकर, शिवाजी जगताप, प्रमोद नरहिरे, पप्पू मडके, प्रशांत निन्हाळ, जुबेर पठाण, धैर्यशील मडके आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बापू भंडारे यांनी केले, तर आभार अशोक डिकले यांनी मानले.

190921\05560446img-20210919-wa0053.jpg

कळंब फोटो

Web Title: Plantation in ‘that’ area which became ‘dumping ground’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.