फिर्यादी भाऊच निघाला मारेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:24+5:302021-09-26T04:35:24+5:30
उस्मानाबाद : तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह आरसोली ते देवळाली रस्त्यावरील चारीत फेकून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. ...

फिर्यादी भाऊच निघाला मारेकरी
उस्मानाबाद : तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह आरसोली ते देवळाली रस्त्यावरील चारीत फेकून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. यानंतर गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे वेगाने हलवून फिर्याद देणाऱ्या भावासच शुक्रवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखेने शनिवारी दिली.
भूम तालुक्यातील आरसोली ते देवळाली रस्त्यावर गुरुवारी एक मृतदेह आढळून आला होता. परंडा पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तो मृतदेह भूम तालुक्यातील आरसोली येथील विलास आबासाहेब गोयकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मयताचा भाऊ दिलीप गोयकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार परंडा ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. मयतावर झालेले निर्घृण वार व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीवा जैन, अपर अधीक्षक नवनीतकुमार कावत, सहायक अधीक्षक एम. रमेश यांनी गुन्हे शाखेला तपास करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी उपनिरीक्षक शैलेंद्र पवार यांच्यासह कर्मचारी वलीउल्ला काझी, शिवाजी शेळके, महेश घुगे, गणेश सर्जे, बबन जाधवर, विठ्ठल गरड, धनंजय कवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. उपनिरीक्षक पवार यांनी फिर्यादी भावाकडे चौकशी सुरू केली असता त्यांच्या तक्रारीत व जबाबात विसंगती दिसून येऊ लागली. त्यामुळे संशय बळावला. त्यामुळे गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मयताच्या घराकडे मोर्चा वळवून तेथील स्थितीची पाहणी केली. या वेळी काही संशयास्पद बाबी दिसून आल्याने फिर्यादीची उलटतपासणी घेण्यात आली. तेव्हा त्याने हा खून आपणच केल्याची कबुली दिली. लागलीच आरोपी दिलीप गोयकर यास ताब्यात घेऊन परंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अवघ्या बारा तासांत उपनिरीक्षक पवार व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
कुऱ्हाडीने केले वार...
मयत विलास गोयकर हा खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता. २१ सप्टेंबर रोजी तो कोर्टात तारखेस जाऊन नंतर मद्यपान करून घरी आला. घरी परतल्यावर त्याने भाऊ दिलीप गोयकर यास शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे वैतागलेल्या दिलीप याने विलासच्या डोक्यावर, गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह वडील आबासाहेब गोयकर यांच्या मदतीने पोत्यात बांधून दुचाकीवरून आरसोली-देवळाली रस्त्यावरील एका चारीत आणून टाकला.