अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन खरिपाचा विमा हप्ता भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:21+5:302021-07-12T04:21:21+5:30

उस्मानाबाद : ९ जुलै रोजी उस्मानाबाद तालुक्यातील काही भागांत वातावरणीय बदलामुळे झालेल्या मुसळधार पावसाने जीवित हानीसह खरीप पिके, शेती ...

Pay the kharif insurance premium realizing the damage caused by heavy rains | अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन खरिपाचा विमा हप्ता भरा

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन खरिपाचा विमा हप्ता भरा

उस्मानाबाद : ९ जुलै रोजी उस्मानाबाद तालुक्यातील काही भागांत वातावरणीय बदलामुळे झालेल्या मुसळधार पावसाने जीवित हानीसह खरीप पिके, शेती व मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुर्दैवाने दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींचा सातत्याने सामना करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विमा मिळाला नाही म्हणून नाउमेद न होता या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन खरीप २०२१ चा पीक विमा हप्ता भरून पिके संरक्षित करून घ्यावीत, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटून माती वाहून गेली. अनेकांच्या शेतात तलावाप्रमाणे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते व पुलांचीदेखील हानी झाली आहे. या अनुषंगाने आ. पाटील यांनी कामेगाव, बोरखेडा, सांगवी, समुद्रवाणी, मेंढा, घुगी, लासोना, टाकळी (बें.), बोरगाव (राजे), कनगरा या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या नुकसानीपोटी केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून लवकरात लवकर भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांनी मोबाइल ॲपवर अथवा टोल फ्री क्रमांकांवर नुकसानीची सूचना देण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, तहसीलदार गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी जाधव, जि.प. बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, नागप्पा पवार, संगमेश्वर स्वामी, युवराज ढोबळे, विजयसिंह जंगाले, नीलकंठ पाटील, बाळासाहेब खांडेकर, ओम मगर, दयानंद शिंदे आदी उपस्थित होते.

चौकट.......

मदत मिळवून देण्याची ग्वाही

या नैसर्गिक आपत्तीमध्ये बोरखेडा येथील युवक समीर शेख यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला, तर लासोना येथील बबन रसाळ या वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरू आहे. महसूल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. आ. पाटील यांनी पीडित कुटुंबियांना भेटून घटनेप्रती संवेदना व्यक्त करीत सांत्वन करून शासनाकडून आर्थिक मदतीची ग्वाही दिली.

Web Title: Pay the kharif insurance premium realizing the damage caused by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.