रुग्णांची माेफत आराेग्य तपासणी अन् समुपदेशनाचा ‘डाेस’ही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:23+5:302021-09-05T04:36:23+5:30
दयानंद काळुंके अणदूर (जि. उस्मानाबाद) : खाजगी डाॅक्टर जास्तीचे पैसे घेतात... महागडी औषधे देतात... डाॅक्टर पैशाच्या प्रमाणात लक्ष देत ...

रुग्णांची माेफत आराेग्य तपासणी अन् समुपदेशनाचा ‘डाेस’ही...
दयानंद काळुंके
अणदूर (जि. उस्मानाबाद) : खाजगी डाॅक्टर जास्तीचे पैसे घेतात... महागडी औषधे देतात... डाॅक्टर पैशाच्या प्रमाणात लक्ष देत नाहीत... अशा स्वरूपाच्या तक्रारी आपल्या कानी नित्याने पडतात; परंतु सर्वच खाजगी डाॅक्टर एकसारखे नसतात. आराेग्य सेवेचा वसा घेऊन काम करणाऱ्या डाॅक्टरांची आजही कमी नाही. तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील डाॅ. सिद्रामप्पा खजुरे हे अशांपैकीच एक. ग्रामीण भागातील रुग्णांना नाममात्र शुल्कात सेवा देण्याचा त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला. काेराेना संकट काळापासून तर ते प्रतिदिन ५० रुग्णांची माेफत आराेग्य तपासणी करतात. साेबतच समुपदेशनाचा ‘डाेस’ही देताहेत.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील डाॅ. सिद्रामप्पा खजुरे यांनी ‘एमबीबीएस’ पूर्ण केल्यानंतर माेठे शहर न गाठता ‘पैसे कमी मिळाले तरी चालतील; पण गड्या आपला गावच बरा’ असे म्हणत खुदावाडी गाठले आणि नाममात्र शुल्कात सेवा देण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील लाेकांची आर्थिक परिस्थिती पाहून कालांतराने प्रतिदिन ५० रुग्णांची आराेग्य तपासणी व समुपदेशनाचा निर्णय घेतला. यात कुठेही खंड न पडू देता, ही सेवा अविरतपणे सुरू आहे. काेराेनाच्या काळात शहरांसाेबतच ग्रामीण जनताही भयभीत झाली हाेती. त्यांना आधार देण्याचे काम डाॅ. खजुरे यांनी केले. खुदावाडीसह परिसरातील दाेन तांड्यांवरील घराेघरी जाऊन त्यांनी गाेरगरीब लाेकांची माेफत आराेग्य तपासणी केली. साेबतच आराेग्याच्या दृष्टिकाेनातून काेणती काळजी घ्यावी? याबाबत समुपदेशनही केले. डाेअर टू डाेअर गेल्यानंतर अनेक कुटुंबांना लाॅकडाऊनच्या काळात एकवेळचे जेवणही मिळत नसल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. यानंतर त्यांनी संबंधितांच्या घरी जाऊन अन्नधान्याचे किट वाटप केले. डाॅ. खजुरे यांच्या या दातृत्व वृत्तीचे खुदावाडीसह परिसरात काैतुक हाेत आहे.
काेट...
कोरोनाचा संसर्ग ओसरला म्हणून ग्रामस्थांनी गाफील राहू नये. सध्या सर्दी, खोकला, तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अकारण घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडणे गरजेचेच असेल तर मास्कचा नियमित वापर करावा. थाेडीबहुत लक्षणे दिसून येताच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डाॅ. सिद्रामप्पा खजुरे, खुदावाडी.