पाथरूड-खर्डा रस्त्याचे काम अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:37 IST2021-03-01T04:37:05+5:302021-03-01T04:37:05+5:30
वाहनधारकांना दिलासा भूम : तालुक्यातील पाथरूड ते खर्डा रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून याकडे ...

पाथरूड-खर्डा रस्त्याचे काम अखेर सुरू
वाहनधारकांना दिलासा
भूम : तालुक्यातील पाथरूड ते खर्डा रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर या राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम अखेर प्रशासनाने हाती घेतले आहे. शिवाय, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन रस्त्याचे कामदेखील सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
खराब रस्त्यामुळे पार्डी घाट व अंतरवली परिसरात वाहने अडवून लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. पार्डी घाटात हा रस्ता ९ मीटर असून, उर्वरित खर्डापर्यंत ५.५० मीटर आहे. अगोदरच रस्ता अरुंद असून, त्यातच जागोजागी खड्डे पडल्यामुळे संपूर्ण ४५ किलोमीटरचा रस्ताच खड्ड्यात गेल्याचे दिसत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून पाठपुरावा सुरू असून, प्रशासन मात्र केवळ खड्डे बुजविण्याचे काम करून चालढकल करीत आहे. याच रस्त्यावरून शिर्डी-नाशिकला जाण्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणाऱ्या साई भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. शिवाय, भूम तालुक्यातून पुणे, नगर, जामखेडकडे जाणाऱ्या वाहनांचीही या रस्त्यावर नेहमीच ये-जा सुरू असते. या नादुरुस्त रस्त्यामुळे वाहनाची झीज होत होती. याबाबत ‘लोकमत’ने ७ फेब्रुवारी रोजी ‘४५ कि.मी. रस्ता गेला खड्ड्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळी वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
चौकट.......
नवीन कामाला मंजुरी
पाथरूड-खर्डा ५७ राज्य मार्गाचे ४५ कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या नवीन कामालादेखील मंजुरी मिळाली आहे. पार्डी फाटा ते खर्डा सरहद्दपर्यंत सरासरी १० मीटर डांबरी रोड होणार असून, २ मीटर साइड पट्टी राहणार आहे, तसेच शहरातून शासकीय विश्रामगृह ते एरिगेशन कार्यालयापर्यंत १४ मीटरचा क्राँक्रीट (सिमेंट) रोड, २ मीटर फुटपाथ व दीड मीटर नालीचे काम होणार आहे. या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी लवकरच संबंधितांना प्रशासनाकडून नोटिसा दिल्या जाणार आहेत. तूर्तास खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, साधारण एप्रिल महिन्यापासून नवीन रोडचे काम सुरू होईल. यासाठी १८४ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच. सी. मुंढे यांनी दिली.