लाच घेताना उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत जेरबंद
By Admin | Updated: July 17, 2014 01:09 IST2014-07-17T00:56:13+5:302014-07-17T01:09:27+5:30
उस्मानाबाद : मावेजाची रक्कम देण्यासाठी मंजूर रकमेच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारताना येथील उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

लाच घेताना उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत जेरबंद
उस्मानाबाद : मावेजाची रक्कम देण्यासाठी मंजूर रकमेच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारताना येथील उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथील एमआयडीसीसाठी काही शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीतील फळझाडांपोटी संबंधित शेतकऱ्यांना मावेजाही मंजूर झाला आहे. सदर मावेजाची रक्कम देण्यासाठी उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांनी संबंधित शेतकऱ्यांकडे मंजूर मावेजाच्या पाच टक्के इतकी रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी केली असल्याची लेखी तक्रार दत्तात्रय अर्जुन देशमाने, अरूण केरबा गरड, दगडू भानुदास सोमासे, मुकुंद केरबा गरड, संजय जनार्दन उकरंडे, हणमंत बाबूराव नाईकवाडी आणि मोरे नामक महिला या सात शेतकऱ्यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले, पोनि शेख, पोनि बाचके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या शोभा राऊत यांच्याच उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा लावला होता.
यावेळी राऊत यांनी पंचांसमक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, राऊत यांच्या पर्समधून ३९ हजार २०० रूपये रक्कमही या पथकाने जप्त केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एसीबीच्या पथकाकडून राऊत यांच्या कार्यालयाची झाडाझडती व पंचनामा सुरू होता. (प्रतिनिधी)