उस्मानाबादेत डॉ. करजंकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:27 IST2019-06-01T12:26:36+5:302019-06-01T12:27:08+5:30
मारहाण करून दरोडेखोरांनी सोने, रोकड लांबविली

उस्मानाबादेत डॉ. करजंकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा
उस्मानाबाद : येथील प्रसिद्ध डॉ. सुरेश करंजकर यांच्या राहत्या घरी शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून मोठ्या प्रमाणात सोने व रोकड लंपास केली आहे.
दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात डॉ. करंजकर यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी स्वत: घटनास्थळास भेट दिली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील समर्थनगर भागात प्रसिद्ध डॉ. करजंकर यांचे घर तसेच हॉस्पिटलही आहे. याच घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. अज्ञात दहा ते पंधरा सशास्त्र दरोडेखोरांनी घराच्या गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला.
यावेळी घराचा समोरचा दरवाजा बंद होता. त्यामुळे दरोडेखोरांनी दरवाजाचा कडी-कोंडा उचकटून घरात प्रवेश मिळविला. तलवार तसेच अन्य धारदार शस्त्रांचा धाक दाखवून खोल्यांतील कपाटांमध्ये ठेवलेला ऐवज तसेच तिजोरी फोडून त्यातील मोठ्या प्रमाणात सोने, रोकड लांबवली. दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात डॉ. करजंकर यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. सशस्त्र दरोड्यामुळे उस्मानाबाद शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. घरासमोरील सीसीटीव्ही तसेच परिसरातील अन्य सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचेही त्यांनी अधिकाºयांना निर्देश दिले आहेत.