उस्मानाबाद : जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही दिवशी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्य विक्रीची (दारुची) दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनिमित आदर्श आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे आणि मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९च्या कलम १४२ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्याची आणि दारुची दुकाने बंद ठेवावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच १४ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस तसेच मतदानाच्या दिवशी १५ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील. १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार ज्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या तालुका मुख्यालयाच्या हद्दीत मतमोजणी संपेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.