ऊसणे सव्वाचार लाख रुपये तीस दिवसांत परत करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST2021-09-24T04:39:06+5:302021-09-24T04:39:06+5:30
कळंब - हात ऊसणे पैसे वेळेत परत तर दिले नाहीतच, शिवाय दिलेला धनादेशही बँकेस वटवू न देणाऱ्या व्यक्तिला तालुका ...

ऊसणे सव्वाचार लाख रुपये तीस दिवसांत परत करण्याचे आदेश
कळंब - हात ऊसणे पैसे वेळेत परत तर दिले नाहीतच, शिवाय दिलेला धनादेशही बँकेस वटवू न देणाऱ्या व्यक्तिला तालुका न्यायालयाने एक महिन्याच्या आत रक्कम परत करावी, असे आदेशित करून तीस दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली असता तालुका न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आला आहे.
याबाबत कळंब येथील ॲड. डी. एस. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरभद्र भुजंगय्या स्वामी यांच्याकडून घरगुती कारणासाठी माणिक विठ्ठल कातमांडे (रा. पुनर्वसन सावरगाव, कळंब) यांनी २०११ मध्ये ४ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यातील २७ हजार रुपये ०२ ऑगस्ट २०१२ रोजी स्वामी यांना परत दिले होते. उर्वरित ४ लाख २८ हजार रुपये परत करण्यासाठी १३ ऑगस्ट २०१२ रोजी माणिक कातमांडे यांनी स्वामी यांना एका बँकेचा संयुक्त खात्याचा धनादेश दिला होता. यावर कातमांडे यांनी मात्र दिलेला चेक वटवण्यास हरकत घेतल्याने स्वामी यांना रक्कम मिळाली नाही. यानंतर वेळोवेळी पैशाची मागणी करूनही कातमांडे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने वीरभद्र स्वामी यांनी शेवटी तालुका न्यायालयात ॲड. एम. बी. देशमुख यांच्यामार्फत जानेवारी २०१६ रोजी माणिक कातमांडे विरुद्ध दावा दाखल केला होता. यावर न्यायालयात सुनावणी होवून दोन्ही बाजूचे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावे तपासून न्यायमूर्ती जी. व्ही. देशपांडे यांनी कातमांडे यांना तीस दिवसांच्या आत स्वामी यांना ४ लाख ३० हजार रुपये द्यावेत, त्याच बरोबर ३० दिवसाची साधी कैदेची शिक्षा सुनावली होती. या आदेशाला आव्हान देत जिल्हा न्यायालयात कातमांडे यांनी फौजदारी अपील केले होते. या अपिलावर जिल्हा व सत्र न्यायालय सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पटेकर यांनी तालुका न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. याबाबत फिर्यादी वीरभद्र स्वामी यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड. एम. बी. देशमुख यांनी कामकाज पाहिले.