निवडणूक प्रचारावरून जमावाने केलेल्या हल्ल्यात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST2021-01-13T05:23:42+5:302021-01-13T05:23:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरगा (जि. उस्मानाबाद) : ग्रामपंचायत निवडणुकीत विराेधी पॅनेलचे काम का करताेस? अशी विचारणा करत एका गटातील ...

One killed in mob attack on election campaign | निवडणूक प्रचारावरून जमावाने केलेल्या हल्ल्यात एक ठार

निवडणूक प्रचारावरून जमावाने केलेल्या हल्ल्यात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरगा (जि. उस्मानाबाद) : ग्रामपंचायत निवडणुकीत विराेधी पॅनेलचे काम का करताेस? अशी विचारणा करत एका गटातील १७ ते १८ जणांनी दाेघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दिनांक १० जानेवारी राेजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती मिळताच उमरगा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी गावात माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे.

उमरगा तालुक्यातील थोरलेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत दोन पॅनेलमध्ये सरळ लढत हाेत आहे. या निवडणुकीच्या प्रचारावरून गावात काही दिवसांपासून धुसफूस सुरू हाेती. त्याचे पर्यावसान रविवारी सकाळी भांडणात झाले. ‘तू विरोधी पॅनेलचा प्रचार का करतोस’ अशी विचारणा करत एका गटाने गोविंद गोपाळ कोराळे (वय २८) यांच्यावर काेयत्यासह कुऱ्हाडीने हल्ला केला. या भांडणाची माहिती कळताच गावातील वाघाटपीर देवस्थानचे पुजारी हणमंत अर्जुन परसराम (वय ४८) हे भांडण साेडविण्यासाठी गेले असता, ‘तुम्हीही त्याच गटाचे काम करता’, असे म्हणत त्यांच्यावरही सतरा ते अठरा जणांच्या जमावाने हल्ला केला. कुऱ्हाड तसेच काेयत्याचा घाव खाेलवर लागल्याने पुजारी हणमंत परसराम यांचा जागीच मृत्यू झाला तर गाेविंद कराळे हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या थरारक हल्ल्याची माहिती मिळताच उमरगा पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यानंतर परसराम यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उमरगा उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला तर गंभीर जखमी काेराळे यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात केल्यामुळे दिवसभर तणावपूर्ण शांतता हाेती. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

Web Title: One killed in mob attack on election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.