अवैध वाळूसाठाप्रकरणी दहा जणांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST2021-02-05T08:17:14+5:302021-02-05T08:17:14+5:30
उमरगा : तालुक्यातील बेन्नीतुरा नदीतून अवैध वाळू उपसा करून साठवणूक केलेल्या वाळू साठ्याचा उमरगा महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामा ...

अवैध वाळूसाठाप्रकरणी दहा जणांना नोटीस
उमरगा : तालुक्यातील बेन्नीतुरा नदीतून अवैध वाळू उपसा करून साठवणूक केलेल्या वाळू साठ्याचा उमरगा महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामा झाल्यानंतरही कारवाईस दिरंगाई केली जात होती. याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने मंगळवारी अवैध वाळू साठविलेल्या दहा लोकांना २५ लाख ५१ हजार ५०० रुपये दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्या आहेत. पंचनामे झाल्यानंतर तब्बल सात दिवसांनी ही कार्यवाही करण्यात आली.
तालुक्यातील बेनितुरा नदीकाठच्या पारसखेडा, भिकारसांगवी, चंडकाळ आदी शिवारात वाळू उपसा करून साठवणूक करण्यात आली होती. मंडल अधिकारी व तलाठ्यांनी २७ जानेवारी, २०२१ रोजी सायंकाळी पारसखेडा व भिकारसांगवी येथील वाळू साठ्याला भेट देऊन पंचनामा केला, तसेच जीपीएस लोकेशन दर्शविणाऱ्या कॅमेऱ्याद्वारे फोटो काढले, परंतु पाच दिवसांत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
याबाबत ‘लोकमत’ने ‘पंचनाम्यानंतरही कारवाई होईना’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर, महसूल प्रशासनाने तातडीने वाळू माफियांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. भिकारसांगवी येथील ८ व पारसखेडा येथील २ अशा एकूण १० लोकांनी अवैध वाळू उपसा करून ८४ ब्रास वाळूसाठा केल्याचा पंचनामा मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला. यावरून तहसीलदार संजय पवार यांनी लागलीच या दहा लोकांना २५ लाख ५१ हजार ५०० रुपये दंड का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली.
दरम्यान, मंगळवारी तहसीलदारांकडे पंचनामा अहवाल सादर झाल्यानंतर १० लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्या, तरी अहवाल सादर करण्यास विलंब करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांना का पाठीशी घातले जात आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चौकट.....
दोन ट्रॅक्टरला त्याच दिवशी नोटिसा
२७ जानेवारी रोजी बेन्नीतुरा नदीतून अवैद्यरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरही ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर, त्या ट्रॅक्टर मालकांना २ लाख ६० हजार ७५० रुपये दंड भरण्याची नोटिसा देण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी जयवंत गायकवाड यांनी दिली.
मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
उमरगा तालुक्यातील चेंडकाळ, गुरुवाडी, पारसखेडा, भिकारसांगवी आदी गावांतून बेन्नीतुरा नदी जाते. या ठिकाणी अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जातो. मात्र, एकाही वाहनावर कारवाई करण्यात येत नाही. आजही हजारो ब्रास वाळू उपसा करून साठविण्यात आली आहे. आजपर्यंत अवैध वाळू उपसा केलेल्या वाहनावर कारवाई करून, याकडे दुर्लक्ष करून वाळू माफियासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच कायमची अवैध वाळू उपसा बंद करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने निवेदनाद्वारे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.