७ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही, नाव वगळ्याची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:58+5:302021-03-27T04:33:58+5:30
उस्मानाबाद : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे छायाचित्र नाही अशा मतदारांनी छायाचित्र जमा न केल्यास ...

७ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही, नाव वगळ्याची प्रक्रिया सुरू
उस्मानाबाद : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे छायाचित्र नाही अशा मतदारांनी छायाचित्र जमा न केल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही अनेक व्यक्तींनी फोटो जमा न केल्याने मतदार यादीतून नाव वगळण्याची मोहीम सुरू असून, जिल्ह्यातील तब्बल ७ हजार १८७ जणांचे नाव वगळले जाणार आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे मतदान महत्त्वाचे ठरत असते. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुण आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सजग असतो. २५ सप्टेंबर २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्यात आली होती. या कालावधीत मयत, स्थलांतरित व्यक्तींची मतदार यादीतून नाव वगळणे, अनेक मतदारांचे नाव, पत्ता दुरुस्त करणे असा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यात १५ हजार ७७८ तरुणांनी नाव समाविष्ट केले आहे, तर दुसरीकडे ७ हजार १८७ व्यक्तींनी मतदार यादीत फोटो देण्याकडेच पाठ फिरविल्याचे आढळून आले. या व्यक्तींनी निवडणूक विभागाकडे फोटो जमा करावेत, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, फोटो मिळत नसल्याने या व्यक्तींची नावे वगळण्यास सुरुवात झाली आहे.
विधानसभानिहाय आकडेवारी
विधानसभा मतदारसंघ
उमरगा २९६८१७ ००००
तुळजापूर ३५५५४६ ११०७
उस्मानाबाद ३५५४५१ ४४४८
परंडा ३१८३८० १६३२
जिल्ह्यातील मतदार
१३२६१९४
छायाचित्र नसलेले मतदार
७१८७
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे छायाचित्र नाही त्यांना फोटो जमा करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. छायाचित्र न जमा केल्यास नाव वगळण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. मात्र, अनेक मतदारांनी छायाचित्र जमा केलेले नाही. त्यामुळे त्यांचे नाव वगळले जात आहे. येत्या काही दिवसांत छायाचित्र नसलेली नावे वगळली जातील.
डॉ. योगेश खेरमाटे, मतदार नोंदणी अधिकारी, उस्मानाबाद.