धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून, ती नऊ रात्री पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल. महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवीने घेतलेली ही विश्रांती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. या महोत्सवाची कोजागरी पौर्णिमेला सांगता होणार आहे.
२२ सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापना होईल. यानंतर २३, २४ व २५ रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक निघणार आहे.
१ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल, तर २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त देवीचा सीमोल्लंघन सोहळा व मंदिरातील मिरवणुकीनंतर पुन्हा देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे.
कोजागरी पौर्णिमेनंतर ७ ऑक्टोबर रोजी पहाटे देवी मूर्तीची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल. ८ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाने या शारदीय महोत्सवाची सांगता होणार आहे.
देवीची कधी कोणत्या रूपात पूजा?
२६ सप्टेंबर - रथालंकार पूजा २७ सप्टेंबर - मुरली अलंकार पूजा २८ सप्टेंबर - शेषशाही पूजा २९ सप्टेंबर - भवानी तलवार पूजा ३० सप्टेंबर - महिषासूरमर्दिनी अलंकार पूजा कोजागरी पौर्णिमेनंतर होणार पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना
अशी आहे आख्यायिका...
पृथ्वीवर महिषासुराचा उन्माद सुरु असताना सर्व देवता भगवान शंकरांकडे धाव घेतात. यानंतर देवी पार्वतीला तुळजाभवानीचे रुप घेऊन महिषासुराचा नायनाट करण्यास विनंती करतात.
महिषासुराशी युद्ध सुरु करण्यापूर्वी देवी ९ दिवस विश्रांती घेते. त्यास घोरनिद्रा म्हटले जाते.
ही निद्रा संपल्यानंतर घटस्थापनेदिवशी युद्धाला सुरुवात होते. घटोत्थापनेनंतर देवी महिषासूरावर विजय मिळवते.
या विजयाचा उत्सव म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. यादिवशी सकाळी सीमोल्लंघन झाल्यानंतर देवीची पुन्हा पाच दिवसीय श्रमनिद्रा सुरु होते, अशी आख्यायिका सांगितली जाते.