जागोजागी तुंबलेल्या नाल्या अन्‌ कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:01+5:302021-01-08T05:44:01+5:30

रहिवाशांचे आरोग्य धोक्यात उस्मानाबाद : शहरातील अजिंठानगर, बौध्दनगर भागातील साफसफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, यामुळे अनेक ठिकाणच्या नाल्या ...

Nallas and piles of rubbish | जागोजागी तुंबलेल्या नाल्या अन्‌ कचऱ्याचे ढीग

जागोजागी तुंबलेल्या नाल्या अन्‌ कचऱ्याचे ढीग

रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

उस्मानाबाद : शहरातील अजिंठानगर, बौध्दनगर भागातील साफसफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, यामुळे अनेक ठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. शिवाय, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याने यातून रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागात तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी बहुजन एकता विकास परिषदेने केली आहे.

शहरातील अजिंठानगर, बौध्दनगर या भागात सध्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिका प्रशासनाकडून नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, काही ठिकाणी या नाल्या कचऱ्याने तुडुंब भरून नालीतील घाण पाणी रस्त्यावर येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या घाण पाण्यातून वाट शोधताना रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय, या घाणीमुळे डास व वराहांचा उच्छाद वाढला आहे. यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुढे येत आहे. या भागात आवश्यक प्रमाणात कचरा कुंड्यांचीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे जागोजागी रस्त्यालगत कचरा पडल्याचे दिसते. त्यामुळे या भागात स्वच्छता मोहीम राबवावी, दर सहा ते आठ दिवसाला डास प्रतिबंध फवारणी करावी, या भागात फिरणाऱ्या वराहांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिषदेने या निवेदनात केली आहे. यावर जिल्हाध्यक्ष प्रशांत बनसोडे, भीम निर्णायक युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे, अरूण गायकवाड, योगेश बनसोडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

चौकट....

...तर आंदोलन करू

घाणीच्या साम्राज्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा अजिंठानगर, बौध्दनगर भागातील रहिवाशांच्या वतीने बहुजन एकता विकास परिषद आगामी काळात आंदोलन उभारेल, असा इशाराही परिषदेने या निवेदनात दिला आहे.

Web Title: Nallas and piles of rubbish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.