चिखल, पाण्यातून शोधावी लागतेय शाळेची वाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST2021-09-09T04:40:00+5:302021-09-09T04:40:00+5:30
बसवराज होनाजे जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा ...

चिखल, पाण्यातून शोधावी लागतेय शाळेची वाट...
बसवराज होनाजे
जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत असून, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील भोसगा पाटीपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या धर्मवीर संभाजी विद्यालयात या शाळेसाठी भोसगा, दस्तापूर, कोळणूर पांढरी, तुगाव या चार गावांतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी पायी आणि सायकल घेऊन येत असतात. शाळेकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वनीकरणापासून आष्टाकासार गावाला जाणाऱ्या जुन्या रस्त्याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांसोबतच वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी तसेच शेतकरी शेतीकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात; परंतु, पावसाळ्यात महामार्गापासून तीनशे फूट अंतरावर मोठ्या प्रमाणावर पाणी थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेला जाण्यासाठी चिखल आणि घाण पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना तर शाळेपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर सायकली ठेवून पाण्यातून शाळा गाठावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने हा रस्ता होण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने हा त्रास कायमस्वरूपी सुरूच आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.
कोट......
संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या वतीने तहसीलदार आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निवेदन देऊन रस्ता तयार करण्यासाठी विनंती केली आहे. परंतु, आजपर्यंत तरी रस्ता झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- तानाजी साळुंके, मुख्याध्यापक, भोसगा
सर्वच ठिकाणी शाळा बंद असतानाही येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑफलाईन शाळा सुरू ठेवली आहे. परंतु, पावसामुळे विद्यार्थ्यांना चिखल, पाण्यातून जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.
- संजय मानाळे, पालक, भोसगा
अनेक वेळा मागणी करूनही संबंधित विभाग रस्ता करील का नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायतीनेच आपल्या स्तरावर रस्त्यावर मुरूम टाकून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- वैजीनाथ कागे, माजी उपसरपंच, भोसगा