थकबाकी वसुलीसाठी महावितरण अधिकाऱ्यांची दारोदार भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:22+5:302021-09-22T04:36:22+5:30
वाशी : ५ कोटी २० लाख रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आता दररोज ग्राहकांच्या दारात जात असून, ...

थकबाकी वसुलीसाठी महावितरण अधिकाऱ्यांची दारोदार भटकंती
वाशी : ५ कोटी २० लाख रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आता दररोज ग्राहकांच्या दारात जात असून, चालू महिन्यात ४० लाखांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अभियंत्यांनी दिली़ दरम्यान, तालुक्यात ग्राहकांच्या सेवेसाठी वीज कंपनीचे दोन विभाग असून, तिसऱ्या विभागाचीही निर्मिती करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे़
वाशी तालुक्यातील पारगाव व वाशी असे दोन विभाग असून, या दोन्ही विभागाअंतर्गत औद्योगिकच्या १३३ ग्राहकांकडे ५३ लाख ५७ हजार, निवासी ७ हजार ९६७ ग्राहकांकडे ४ कोटी ३३ लाख तर वाणिज्यच्या ४४४ ग्राहकांकडे ४७ लाख ९७ हजार अशी थकबाकी आहे. त्यामुळे वीज कंपनीचे उपविभागीय अभियंता रमेश शेंद्रे हे सहकाऱ्यांसह वीजबिलाच्या वसुलीसाठी दारोदार फिरताना दिसून येत आहेत़ चालू महिनाभरात चाळीस लाखांची वसुली झाली असून, ती नगण्य असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वसुलीची तगादा विद्युत ग्राहकांना लावला जात आहे़ उपरोक्त थकबाकीशिवाय तालुक्यात पाणीपुरवठ्याचे ८३ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७ कोटी १० लाख, दिवाबत्तीच्या ७९ ग्राहकांकडे १९ कोटी तर शेतीपंपाच्या ९ हजार ८०९ ग्राहकांकडे ९५ कोटी ७७ लाख रूपये थकबाकी अडकली आहे़ शासनाच्या वतीने विविध विद्युतबिलाच्या थकबाकीसाठी योजना जाहीर केल्या तरी विद्युतग्राहक वीज कंपनीच्या याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाइलाजास्तव वीजबिलाची वसुली न दिल्यास विद्युतपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर भूम व कळंब तालुक्यांतील ५४ गावांचा तालुका झाला़ लोकसंख्या, विद्युत ग्राहक यांच्या तुलनेनुसार तीन विभाग असणे गरजेचे आहे़ सध्या पारगाव व वाशी असे दोन विभाग असून, तालुक्यातील वाढलेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता तालुक्यातील विद्युत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तेरखेडा येथे तिसऱ्या विभागाच्या निर्मितीची गरज ग्राहकांमधून व्यक्त केली जात आहे.
अडचणी सुटेनात...
सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या योजनेमध्ये सहभागी होत बिलाचा भरणा करून वीजबिल ‘झिरो’ केले होते. मात्र, यानंतर शेतीपंपाचा वापर चालू नसतानाही अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आली आहेत. याची चौकशी करण्यासाठी काही शेतकरी वीज कंपनीच्या दारात गेले असता कर्मचाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांची वीजबिलाची अडचण अजूनही कायम असून, असे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.