मुख्यमंत्री महोदय, इतके उस्मानाबादसाठी कराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:50+5:302021-09-18T04:35:50+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प केवळ राज्य शासनाच्या पुढाकाराअभावी पुढे सरकत नसल्याचे सांगत तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी ...

Mr. Chief Minister, do so much for Osmanabad! | मुख्यमंत्री महोदय, इतके उस्मानाबादसाठी कराच !

मुख्यमंत्री महोदय, इतके उस्मानाबादसाठी कराच !

उस्मानाबाद : जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प केवळ राज्य शासनाच्या पुढाकाराअभावी पुढे सरकत नसल्याचे सांगत तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ते मार्गी लावण्याचे साकडे घातले. जिल्ह्याच्या विकासकामांबाबत एक व्यापक बैठक घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले आहे. तीन आमदार, एक खासदार सेनेला दिले आहेत. ही बाब लक्षात घेता उस्मानाबादच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, असे आमदार पाटील यांना वाटते. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पाच प्रकल्पांचा उल्लेख केला आहे.

उस्मानाबादच्या कौडगाव एमआयडीसीत टेक्निकल टेक्सटाइल पार्क स्थापन करण्याबाबत प्राथमिक अहवाल तयार झाला आहे. तो राज्याने मंजूर करून केंद्राकडे पाठविणे गरजेचे आहे. हा प्रकल्प झाल्यास दहा हजार तरुणांना रोजगार मिळू शकते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के वाटा द्यावयाचा आहे. मात्र, अद्याप एक रुपयाही तरतूद न केल्याने हा प्रकल्प संथगतीने सरकत आहे. तुळजापूर शहराचा केंद्राच्या प्रशाद योजनेत समावेश करण्यासाठी पर्यटन खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. यात केवळ राज्याच्या प्राथमिक मागणी पत्राची गरज आहे. त्यास केंद्र १०० टक्के अनुदान देणार आहे. मात्र, याकडेही दुर्लक्ष आहे. वारंवार दुष्काळी स्थितीला सामोरे जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, त्याची निविदाप्रक्रिया थांबवून अन्याय केला जात आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. आपण स्वत: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणाला होतात. मात्र, आता त्यास वर्ष उलटत आले तरी अद्याप ८० टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घेतली जात नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रातून म्हटले आहे.

Web Title: Mr. Chief Minister, do so much for Osmanabad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.