राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक कार्याची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:18+5:302021-09-26T04:35:18+5:30
उमरगा : राष्ट्रीय सेवा योजना ही राष्ट्रसेवा असून, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. तरुण हा देशाच्या ...

राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक कार्याची प्रेरणा
उमरगा : राष्ट्रीय सेवा योजना ही राष्ट्रसेवा असून, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. तरुण हा देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा शिल्पकार आहे. सुसंस्कारित समाजाची निर्मिती सुसंस्कारित तरुणाईमुळेच होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी केले.
येथील आदर्श महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी, माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी मोरे, प्रा. डॉ. उदय दिंडोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गरूड म्हणाले, आपल्या देशाची प्रगती तरुणाईच्या क्रांतीमुळेच शक्य झाली आहे. तरुण हा आपल्या प्रगतिशील देशाचा कणा आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार दिले जातात. रासेयोच्या माध्यमातून घडलेल्या प्रत्येक तरुण विद्यार्थ्याच्या सहभागातून उत्कृष्ट समाजाची निर्मिती शक्य झाली आहे. पूर, भूकंप, वादळ, कोरोना अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्याचे बळ राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणांमध्ये असते. राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन तरुणाईचा व्यक्तिमत्त्व विकास करणारे राष्ट्रीय एकात्मतेचे व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. भीमाशंकर खरोसे, सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. भास्कर शिंदे यांनी केले. आभार प्रा. डॉ. फुलचंद पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, विद्यार्थी ऑफलाईन व ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.