एमपीएससीचा मुहूर्त शनिवारी, साडेसात हजार परीक्षार्थींची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST2021-09-02T05:10:27+5:302021-09-02T05:10:27+5:30
उस्मानाबाद : एमपीएससीकडून दुय्यम सेवा गटातील रिक्त पदांसाठी शनिवारी परीक्षेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातून साडेसात हजारांवर परीक्षार्थींनी ...

एमपीएससीचा मुहूर्त शनिवारी, साडेसात हजार परीक्षार्थींची कसोटी
उस्मानाबाद : एमपीएससीकडून दुय्यम सेवा गटातील रिक्त पदांसाठी शनिवारी परीक्षेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातून साडेसात हजारांवर परीक्षार्थींनी नोंदणी केली असून, उस्मानाबाद व तुळजापुरात २७ केंद्रांवर त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना प्रोटेक्शन किट केंद्रावर देण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी बुधवारी सांगितले.
राज्यातील दुय्यम सेवा गटातील पदांची भरती करण्यासाठी आयोगाकडून शनिवारी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून ७ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना परीक्षा देण्यासाठी उस्मानाबाद व तुळजापूर शहरात एकूण २७ केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यातील २३ केंद्र उस्मानाबादेत तर ४ केंद्र तुळजापुरात आहेत. उस्मानाबादेतील भोसले हायस्कूल येथे ५ केंद्र आहेत. तर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ३, श्री श्री रविशंकर विद्यालयात २ केंद्र असतील. याशिवाय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, अभिनव इंग्लिश स्कूल, विद्यामाता हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन, तुळजापूर रोडवरील ग्रीनलँड हायस्कूल, तेरणा महाविद्यालय, तुळजापूर रोडवरील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शहर ठाण्याजवळील जि.प. कन्या प्रशाला, आर्य चाणक्य विद्यालय, तेरणा पब्लिक स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सरस्वती हायस्कूल, भारत विद्यालय या उस्मानाबादेतील शाळा-महाविद्यालयांत प्रत्येकी १ केंद्र आहे. तुळजापुरातील सैनिकी विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, तुळजाभवानी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथेही केंद्र निश्चिती करण्यात आली आहे. या परीक्षेची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले.
कोविड प्रोटेक्शन किट उपलब्ध...
कोविडच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या अटकावासाठी परीक्षार्थींना आयोगाकडून कोविड प्रोटेक्शन किट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबतच २ व ५ मिलीचे सॅनिटायझर पाऊचही देण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.