वीज मीटरमध्ये फेरफार फौजदारी गुन्हा अन् ३९ हजारांचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:21+5:302021-09-14T04:38:21+5:30
उमरगा : विद्युत मीटरमध्ये फेरफार केल्यास महावितरणकडून वीज ग्राहकांवर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. वीज वापरापोटी ...

वीज मीटरमध्ये फेरफार फौजदारी गुन्हा अन् ३९ हजारांचा दंड!
उमरगा : विद्युत मीटरमध्ये फेरफार केल्यास महावितरणकडून वीज ग्राहकांवर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. वीज वापरापोटी नियमानुसार दरमहा येणारे देयक अदा न करता वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. उमरगा तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत अशी २३ प्रकरणे उघडकीस आली असून सुमारे ३९ हजार ३६६ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
विद्युत मीटरमध्ये होणाऱ्या फेरफाराचे प्रकार हाणून पाडण्यासाठी महावितरणकडून स्वतंत्ररीत्या भरारी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. कुठेही वीजचोरी होत असल्याचा सुगावा लागल्यास पथकातील कर्मचारी त्या ठिकाणी धडक देऊन कारवाई करत आहेत. याअंतर्गत २३ जणांची वीजचोरी पकडण्यात आली. यामध्ये ८७ हजार ५८८ रुपये दंड आकारण्यात आला आहे. यापैकी आजपर्यंत ३९ हजार ३६६ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित दंड वसूल करण्याचे काम चालू आहे.
वीजचोरीसाठी अशीही चलाखी...
संबंधित ग्राहक वीज मीटरशी छेडछाड करणे, मीटरमध्ये रिमोट कंट्रोल बसविणे, खांबावरून अथवा तारांवर आकोडे टाकून थेट वीजपुरवठा घेणे असे वीजचोरीचे प्रकार अवलंबितात.
वीजचोरी करताना अपघात होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ग्राहकास दंडासह रक्कम भरावी लागते. दंड न भरल्यास पोलीस केस केली जाते.
फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड
वीजचोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. वीज मीटर ही महावितरणची मालमत्ता आहे. त्याच्याशी छेडछाड करणे हा कायद्याने अपराध आहे. असे असताना वीज बिल कमी यावे, या उद्देशातून काही जण मीटरशी छेडछाड करून वीजचोरी करतात. हा प्रकार आढळल्यास फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड वसूल करण्याची कायद्यात तरतूद आहे.