दुधाला मिळतोय पाण्यापेक्षाही कमी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:35+5:302021-07-05T04:20:35+5:30
वाशी : कोरोना महामारीचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांनादेखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले ...

दुधाला मिळतोय पाण्यापेक्षाही कमी दर
वाशी : कोरोना महामारीचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांनादेखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे दुधाला प्रतिलीटर पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी दर मिळत आहे. यामुळे दूध उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला असून, शेतीला पूरक असलेला हा व्यवसाय मोडकळीस येतो की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी अनलॉकनंतर दुधाला १८ रुपये प्रतिलीटर इतका दर देण्यात आला. यानंतर यंदा तो २१ रुपये झाला आहे. असे असताना स्थानिक पातळीवर पिशवीतून विकल्या जाणाऱ्या दुधाचा दर मात्र ४४ रुपयेच राहिला. वाशी व भूम तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील दूध संघ बंद पडल्यामुळे सध्या खासगी दूध संघचालकांच्या माध्यमातून दुधाची खरेदी होत आहे. सध्या गोविंद, सोनाई, बारामती, कळंब तालुक्यातील नॅचरल, हैद्राबाद येथील मस्कती, मदर डेअरी, नेचर डिलाईट आदी संघांच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यात दुधाची खरेदी होत आहे. मदर डेअरी व मस्कतीवगळता सर्वच दूध संघांचा खरेदी दर हा ३.५ ते ८.५० साठी २१ रुपये ठेवण्यात आलेला होता.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे खवा व्यवसाय बंद पडल्याने या भट्ट्यावरील दूधदेखील खासगी संघाकडे वळलेले आहे. आता अनलॉकनंतर काही प्रमाणात खव्याच्या भट्ट्या सुरू झाल्या असून, या भट्टी चालकांकडून दुधाला १०० ते ११० रुपये दर दिला जात आहे. एकूणच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी या व्यवसायाकडे वळलेले असताना कमी दरामुळे शेतकरी दुग्ध व्यवसाय मर्यादीत स्वरूपात करण्याची भाषा बोलू लागला आहे.
चौकट..........
पशुखाद्याचे दर गगनाला
सध्या सरकीपेंड, शेंगदाणा पेंड या पशुखाद्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे पशुपालकांना दुभत्या जनावरास खुराक घालताना हात आखडता घ्यावा लागत असून, त्याचा परिणामही दूध उत्पादनावर होत आहे. जनावरांसाठी लागणारा चारा, खुराक याचा सरासरी विचार करता प्रतिलीटर २५ रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. मात्र, दुधाला मिळणारा दर त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय जिवंत ठेवायचा असल्यास शेतीतील इतर पिकाप्रमाणे दुधासदेखील आधारभूत किंमत निश्चित करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
अनुदान रखडले
दोन वर्षांपूर्वी १८ रुपये प्रतिलीटर दराने दुधाची खरेदी होत होती. त्यावेळी शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्यात येत होते. काही दूध संघचालकांनी दुधावरील अनुदान दिले, तर काहींनी निम्मेच अनुदान शेतकऱ्यांना वाटप केले आहे. अद्याप काही दूध संघचालकांकडून शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे येणे बाकी आहेत. त्यामुळे सदरील अनुदान त्वरित वितरित करावे, अशी मागणी होत आहे.