वाहन लावून दुकानात पोहोचेपर्यंत मोबाईलवर धडकला दंडाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:11+5:302021-01-13T05:25:11+5:30

(फोटो - उन्मेष पाटील ११) कळंब : रस्त्यावर दुकान दिसल्याने मुलासाठी २० रूपयांची खेळणी आणण्यासाठी दुकानात शिरणार इतक्यात ...

The message of penalty hit on the mobile till the vehicle was parked and reached the shop | वाहन लावून दुकानात पोहोचेपर्यंत मोबाईलवर धडकला दंडाचा संदेश

वाहन लावून दुकानात पोहोचेपर्यंत मोबाईलवर धडकला दंडाचा संदेश

(फोटो - उन्मेष पाटील ११)

कळंब : रस्त्यावर दुकान दिसल्याने मुलासाठी २० रूपयांची खेळणी आणण्यासाठी दुकानात शिरणार इतक्यात त्यांना २०० रूपये दंडाचा संदेश मोबाईलवर आला.... आजारी असल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या मेडिकल दुकानात औषधे घेत असताना त्यालाही ‘२०० रूपये १५ दिवसात दंड भरा’ असा संदेश धडकला... ही केवळ प्रातिनिधीक उदाहरणे आहेत कळंब पोलिसांनी ई-चलनद्वारे केलेल्या दंडाची. ना चौकशी, ना खातरजमा, थेट दंड ठोठवण्याच्या पोलिसांच्या या कारभारामुळे कळंब शहरात जावे की नाही, असा प्रश्न आता वाहनधारकांना पडला आहे.

कळंब शहर हे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. साहजिकच येथे खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात. शहरातील मुख्य बाजार पेठेबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ढोकी रोड या भागातही मोठी दुकाने आहेत. या भागात खरेदी करताना ग्राहक त्यांची वाहने मुख्य रस्त्याच्या बाजुला लावतात. वास्तविक हा वर्दळीचा रस्ता असल्याने या भागातील हातगाडे, टपऱ्या, भेळ, वडापाव विकणारी दुकाने यांना पर्यायी जागा देऊन ती जागा या वाहनांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या गाड्यांमुळे ग्राहकांना त्यांची वाहने पार्क करणे मुश्किल होते. त्यातच कळंब पोलीस दिवसभरातून कधीही ‘नो पार्किंग’च्या नावाखाली ई-चलनद्वारे दंड ठोठावण्याची मोहीम राबवित असल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत.

कळंब शहरात कोठेही ‘नो पार्किंग’चे फलक नाहीत. मुख्य रस्त्याच्या बाजुला पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. पोलीस प्रशासन ज्या भागात नो पार्किंगच्या नावाखाली दंड बसवत आहे तो भाग नो पार्किंग झोन म्हणून प्रशासनाने जाहीर देखील केलेला नाही. त्या भागात पार्किंग कोठे करावी, याचीही माहिती दिलेली नाही. असे असतानाही पोलिसांच्या वतीने ई-चलनच्या माध्यमातून वाहनधारकांना दंडाचा भुर्दंड का बसविला जात आहे, असा संतप्त सवालही उपस्थित केला जातो आहे.

कळंब शहरात बाहेरगावाहून अनेक ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यांनीही हा ई-चलनचा फटका शहरातच अनुभवायला मिळाल्याचे सांगितले. शहरात रस्त्याच्या बाजुला पांढरी पट्टी मारून त्याच्या आत वाहने उभी करण्यास मुभा दिली जाते. मात्र, कळंब शहरात रस्त्याच्या कडेला वाहनेच उभी करू नका, अन्यथा दंड भरा ही बळजबरी नाविन्यपूर्ण पण शहराच्या हिताची नाही, अशी प्रतिक्रिया बाहेरगावाहून खरेदीसाठी आलेल्या मंडळींनी दिली.

चौकट -

दंड पोलिसांचा, दिलगिरी व्यापाऱ्यांची

रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करून खरेदीला गेले व ते पोलिसांच्या दंड आकारणी पथकाच्या तावडीत सापडले की लगेच त्याचा संदेश संबंधित वाहनधारकाच्या मोबाईलवर जातो. त्यामुळे खरेदीच्या मुडमध्ये असलेल्या ग्राहकाला दंडाचा फटका बसला की तो त्याची नाराजी संबंधित दुकानदाराकडे व्यक्त करीत आहे. ग्राहक नाराज होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना या कार्यवाहीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागत आहे.

चौकट

जागा द्या मग कार्यवाही करा

रस्त्याच्या बाजूला वाहन लावायचे नाही व पार्किंगसाठी जागाही नाही मग शहरात वाहने लावायची कोठे? असा प्रश्न वाहनधारकातून विचारला जातो आहे. कार्यवाही खुशाल करा पण आधी पार्किंगला जागा द्या, अशी मागणीही आता पुढे येते आहे.

चौकट -

पोलीस अधिकाऱ्यांचे ‘नो कॉमेंट्स’

दंडात्मक कारवाईबद्दल माहिती घेण्यासाठी कळंबचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांना समाजमाध्यमातून संदेश पाठवून विचारणा केली. मात्र, त्यावरही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.

Web Title: The message of penalty hit on the mobile till the vehicle was parked and reached the shop