जागा बदलून भरला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:41+5:302021-03-20T04:31:41+5:30
लोहारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. परंतु, लोहारा शहरात ...

जागा बदलून भरला बाजार
लोहारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. परंतु, लोहारा शहरात मात्र शुक्रवारी नियमित जागा बदलून एसबीआय बँकेच्या पाठीमागे आठवडी बाजार भरल्याचे दिसून आले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी झाल्याचे चित्र असताना मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू, जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय बैठका, हॉटेलमध्ये बसण्यास मनाई, रात्री नऊनंतर दुकाने बंद आदी नियम लागू करून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. परंतु, यांची अमलबजावणी होताना दिसत नाही.
लोहारा शहराचा आठवडी बाजार हा शुक्रवारी पोलीस ठाण्याच्या रोडवर भरविला जातो. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील बाजारही बंद ठेवल्याचे प्रशासनाने जाहीर केले. असे असतानाही शुक्रवारी येथील एसबीआय बँकेच्या पाठीमागे भाजीपाला विक्रेत्यांसह इतर व्यापारीही दुकाने लावून बसल्याचे दिसून आले. यावेळी खरेदीसाठी नागरिकांचीही मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे, फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर याकडे साफ दुर्लक्ष झाले होते.
फोटो - लोहारा शहरात पोलीस ठाणे रस्त्यावर भरणारा आठवडी बाजार बंद असला तरी १९ मार्च रोजी एसबीआय बँकेच्या पाठीमागे असा बाजार भरल्याचे चित्र होते.