मराठा सेवा संघाने बहुजनांना एकसंध ठेवण्याचे काम केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST2021-09-02T05:10:31+5:302021-09-02T05:10:31+5:30
उमरगा - पुरोगामी चळवळीत गेल्या ३१ वर्षांपासून कार्य करणाऱ्या मराठा सेवा संघाने महाराष्ट्रात बहुजनांमध्ये जनजागृती करून एकसंध ठेवण्याचे काम ...

मराठा सेवा संघाने बहुजनांना एकसंध ठेवण्याचे काम केले
उमरगा - पुरोगामी चळवळीत गेल्या ३१ वर्षांपासून कार्य करणाऱ्या मराठा सेवा संघाने महाराष्ट्रात बहुजनांमध्ये जनजागृती करून एकसंध ठेवण्याचे काम केले, असे मत जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
तालुका मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शहरातील समाज विकास संस्थेच्या सभागृहात बुधवारी मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे उमरगा शहराध्यक्ष अनिल सगर, तर प्रमुख पाहुणे भास्कर वैराळे हे होते.
प्रारंभी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सूर्यवंशी म्हणाल्या की, जाती-जाती व धर्मांतील तेढ कमी करून समाजात सामंजस्याचे वातावरण निर्माण झाल्याने दंगलीचे प्रमाण कमी होण्यास सर्वांत मोठा वाटा सेवा संघाचा आहे. आपले संघटन संपूर्ण देशभर व विदेशात मजबूतपणे स्थापन करून समाजबांधवांमध्ये आत्मभान निर्माण करून असंख्य लेखक, व्याख्याते, शाहीर, इतिहास संशोधक, विचारवंत तयार करून समाज परिवर्तनाचे कार्य केले असून, येणाऱ्या काळात त्यास व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. यावेळी मोहन जाधव, भास्कर वैराळे, अनिल सगर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे उमरगा तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष अण्णासाहेब पवार, उमरगा शहराध्यक्ष विशाल माने, मुरूमचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, तालुका सचिव सचिन आळंगे, वैशालीताई जाधव, आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी प्रास्ताविक, तर माधव जाधव यांनी सूत्रसंचालन केले.