मकर संक्रांतीचा सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST2021-01-16T04:36:30+5:302021-01-16T04:36:30+5:30
अचलेर : लोहारा तालुक्यातील अचलेर येथे गावातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरातील सभागृहात तसेच भीमनगर येथे हळदी-कुंकू कार्यक्रम ...

मकर संक्रांतीचा सण उत्साहात
अचलेर : लोहारा तालुक्यातील अचलेर येथे गावातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरातील सभागृहात तसेच भीमनगर येथे हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक महिला सर्वांच्या घरी जाण्यापेक्षा सर्वजण एकत्र जमले तर गोडी, प्रेम, स्नेह आणखी वाढतो, हा शुद्ध हेतू ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.
रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी
(फोटो : कालिदास म्हेत्रे)
उस्मानाबाद : येथील जुना उपळा रोड सध्या रहिवासी भाग झाला आहे; परंतु, तेरणा महाविद्यालय ते सांजा चौक बायपास रस्त्यावरून बँक कॉलनीत जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यामुळे येथून पायी जाणेही अशक्य झाले होते. त्यामुळे नागरिकांना लांबचा फेरा मारावा लागत होता. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन येथील विधिज्ञ अॅड. राजेंद्र धाराशिवकर यांनी ‘शंकर प्रतिष्ठान’ या ट्रस्टच्या माध्यमातून या रस्त्याचे खोलीकरण आणि रूंदीकरण केले तसेच रस्ता मजबूत करून नाल्याच्या पाण्याला सिमेंट पाईप टाकून वाट करून दिली. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली आहे.
स्वच्छतागृहाची दुरावस्था
भूम : येथील एस.टी. आगारातील शौचालयाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. मागील काही दिवसांपासून बस डेपोतील शौचालयाच्या साफसफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने येथे सध्या घाणीचे सामराज्य पसरले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, याची साफसफाई तत्काळ करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
वाहनधारक त्रस्त
भूम : तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. झाडाच्या फांद्या वाहनांना घासत असून, यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी वळणावर झुडपे वाढल्यामुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याची पाहणी करून रस्त्यालगत वाढलेली झुडपे त्वरित काढावीत, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
काम रखडले
लोहारा : येथील नगरपंचायतकडून शहरातील जुना तहसील रस्ता व आझाद चौक ते महात्मा फुले चौक हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु, मागल अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी मिलाफ ग्रुपचे अध्यक्ष दादा मुल्ला यांनी केली आहे.
जुगारअड्ड्यांवर पोलिसांचे छापे
उस्मानाबाद : पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर १३ जानेवारीला छापे टाकले. भूम पोलिसांनी मस्कर गल्लीत टाकलेल्या छाप्यात सचिन मस्कर हे सुरट जुगार साहित्य व रोख १ हजार ८४० रुपयांसह मिळून आले तसेच उमरगा पोलिसांनी काया मठ परिसरात छापा टाकून शिवाजी रेणुके यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चालकावर गुन्हा
कळंब : तालुक्यातील डिकळ येथील रामराजे कांबळे हे कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावरून मानवी जिवीतास धोका होील अशा रितीने लोखंडी नळ मिनी ट्रकच्या बाहेर आलेल्या अवस्थेत वाहतूक करीत असताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून १३ जानेवारी रोजी कांबळे यांच्या विरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात भादंसं कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीची चोरी
वाशी : हॉटेलसमोर लावलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना नळीफाटा येथे घडली. इंदापूर येथील दीपक कोरे यांनी त्यांची एमएच २५/ डब्ल्यू १८२४ या क्रमांकाची दुचाकी १२ जानेवारीला नळी फाटा येथील हॉटेल साई समोर लावली होती. दुसऱ्या दिवशी ती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ जानेवारीला वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी
कळंब : कळंब शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर चौक परिसर, देवी रोड या भागात भरणारा भाजी बाजार जुन्या सांस्कृतिक भवनच्या जागेवर भरविण्याची व्यवस्था नगरपरिषदेने केली आहे. मात्र, काही भाजी विक्रेते अजून चौक परिसरात ठाण मांडून बसल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे. त्याकडे पोलीस प्रशासन व पालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन भाजी बाजार चौकात भरू नये, याची दक्षता घेण्याची मागणी होते आहे.
‘अतिक्रमणे हटवा’
कळंब : शहरातून जाणाऱ्या मोहा मार्गावर मोठ्या प्रमाणात हातगाडे, टपऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने थांबत असल्याने या भागात वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेकदा वाहनाचे लहान-मोठे अपघात होत असल्याने वाहनचालकांत वाद होत आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिकांतून होते आहे.
निधन....
प्रशांत हुंडेकर
तुळजापूर : येथील व्हॉलीबॉलपटू प्रशांत प्रतापराव हुंडेकर (वय ४९) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी सायंकाळी लातूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता तुळजापूर शहरातील घाटशीळ रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.