कधी नापिकी कधी पिकांना मातीमोल भाव, कर्ज फेडायचे कसे; नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन
By बाबुराव चव्हाण | Updated: July 6, 2024 19:37 IST2024-07-06T19:36:51+5:302024-07-06T19:37:11+5:30
शेतातच शेतकऱ्याने संपवले आयुष्य

कधी नापिकी कधी पिकांना मातीमोल भाव, कर्ज फेडायचे कसे; नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन
तामलवाडी (जि. धाराशिव) : कधी नापिकी तर कधी पिकांना मातीमोल भाव, डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे, याच्या तणावात ३९ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तुळजापूर तालुक्यातील जळकाेटवाडी शिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली.
जळकाेटवाडी येथील तरूण शेतकरी बिभीषण बाेबडे यांनी शेतात लाखाे रूपये खर्च करून काकडीचे पीक घेतले. मात्र, बाजारात दाखल हाेताच दर घसरले. त्यामुळे उत्पादन खर्चही निघाला नाही. यानंतर त्यांनी शेतीला जाेडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. मात्र, अल्प दरामुळे ताेही अडचणीत आला. परिणामी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डाेंगर वाढत गेला. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शेतातील पत्र्याच्या आडूला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच तामलवाडी पाेलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र चाैगुले घटनास्थळी दाखल हाेत पंचनामा केला. तामलवाडी ठाण्यात या घटनेची नाेंद करण्यात आली आहे. मयत बिभीषण बाेबडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.