४० हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नाेंदविले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:26+5:302021-09-15T04:38:26+5:30

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे ...

Losses reported by 40,000 farmers to insurance companies | ४० हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नाेंदविले नुकसान

४० हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नाेंदविले नुकसान

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे नव्हते झाले. अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टीनंतर ७२ तासांत विमा कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीने नुकसानीची नाेंद करणे बंधनकारक केले आहे. परंतु, या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेकांना नाेंद करताच आलेली नाही. त्यामुळे बुधवारअखेर केवळ ४० हजार शेतकरीच नाेंद करू शकले.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पेरणी उरकली. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पिकेही जाेमदार आली. परंतु, ही पिके वाढीच्या तसेच फुले लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने सुमारे २१ ते २५ दिवसांचा खंड दिला. त्यामुळे उडीद, मूग या कमी कालावधीच्या पिकाला पुरेशा शेंगा लागल्या नाहीत. ज्या लागल्या त्या भरल्या गेल्या नाहीत, तर साेयाबीनची वाढ खुंटली. या संकटातून हाती लागलेल्या शेतमालातून किमान उत्पादन खर्च तरी निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. उडीद, मुगाची काढणी सुरू असतानाच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. अनेक भागांत दाेन ते तीनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली. काढणी झालेली पिके वाढून गेली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. हाती आलेले सर्वच निसर्गाने हिरावल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा विका कंपनीकडे लागल्या. परंतु, पूर्वीप्रमाणे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे केले जात नाहीत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अतिवृष्टी झाल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला नुकसान कळविणे बंधनकारक केले आहे. बहुतांश शेतकरी ऑनलाईन कळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने ॲप सातत्याने हॅंग हाेत हाेते. तसेच अन्य तांत्रिक अडचणींनाही ताेंड द्यावे लागत असे. परिणामी हाताताेंडाशी आलेला घास वाया गेला असतानाही अनेकजण विमा कंपनीला कळवू शकले नाहीत. आजवर जिल्हाभरातून केवळ ४० हजार शेतकरीच कंपनीकडे नुकसान नाेंदवू शकले. ही संख्या आणखे वाढू शकते, असे कृषी विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

चाैकट...

जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा...

जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नुकसान नाेंदविताना काेणकाेणत्या अडचणी येत आहेत? त्यावर उपाय काय? आदी बाबींचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त जे शेतकरी विमा कंपनीकडे ऑनलाईन नाेंदी करू शकले नाहीत, त्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

Web Title: Losses reported by 40,000 farmers to insurance companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.