lok sabha election 2019 : नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली तरी उमेदवारीवर अडले घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:15 IST2019-03-19T20:14:34+5:302019-03-19T20:15:17+5:30
हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़

lok sabha election 2019 : नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली तरी उमेदवारीवर अडले घोडे
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अजूनही संपुष्टात आलेला नाही़ मंगळवारपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरु असतानाही इच्छुकांसह राजकीय कार्यकर्त्यांच्याही नजरा मुंबईकडेच लागून आहेत़ युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे
सेनेचे विद्यमान खासदार प्रा़ रवींद्र गायकवाड यांच्याविरोधातील एक गट प्रबळ बनल्याने त्यांच्या उमेदवारीस जोरदार विरोध आहे़ त्यामुळे सेनेची उमेदवारी पक्षप्रमुखांनी अद्याप लटकूनच ठेवली आहे़ सातत्याने चकरा मारून झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात दोन्ही गटांचे पदाधिकारी मुंबईतच तळ ठोकून आहेत़ सेनेतील या कुरघोड्या पाहून भाजपनेही स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत जोर लावला आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीतही संभ्रमच आहे़ आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह वरिष्ठ पातळीवरुन आहे़ शिवाय, जि़प़ उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्याही नावावर चर्चा घडविली जात आहे़
काँग्रेससाठी आग्रह
लातूर व उस्मानाबादच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़ दरम्यान, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडेल, अशी चिन्हे अजून तरी दिसत नाहीत़ एकंदर, युती व आघाडीचे घोडे उमेदवारीवरुनच अडल्याचे चित्र आजघडीला मतदारसंघात आहे़ उमेदवारीच जाहीर नसल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप गती मिळालेली नाही़