उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:21 IST2018-12-29T18:20:44+5:302018-12-29T18:21:33+5:30
आरोपीस येथील विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़

उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास सक्तमजुरी
उस्मानाबाद : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस येथील विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना २९ मार्च २०१७ रोजी घडली होती़
याबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड़ महेंद्र देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, एक महिला २९ मार्च २०१७ रोजी कामानिमित्त उस्मानाबादेत आली होती़ काम करून ती घरी गेली असता तिची ८ वर्षाची मुलगी रडत बसली होती़ तिने तिच्याकडे विचारणा केली असता हनुमंत ढेरे याने २९ मार्च रोजी दुपारी तिचा विनयभंग केल्याचे पीडित मुलीने सांगितल्याची तक्रार त्या महिलेने आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली होती़ या तक्रारीवरून हनुमंत ढेरे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
या प्रकरणात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड़ महेंद्र बी़ देशमुख यांनी काम पाहिले़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अॅड़ देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश आऱजे़राय यांनी आरोपी हनुमंत ज्योतिराम ढेरे याला भादंवि कलम ३५४ अ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १० अन्वये दोषी ग्राह्य धरून ५ वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़ दंडातील १० हजार रूपये पीडित मुलीस अथवा तिच्या पालकांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे अॅड़ देशमुख यांनी सांगितले़