‘झेडपी’तील लेट लतिफांना नाेटिसेची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:39+5:302021-09-16T04:40:39+5:30
उस्मानाबाद - जिल्हा परिषदेतील लेट लतिफ अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी कडक धाेरण अवलंबिले ...

‘झेडपी’तील लेट लतिफांना नाेटिसेची मात्रा
उस्मानाबाद - जिल्हा परिषदेतील लेट लतिफ अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी कडक धाेरण अवलंबिले आहे. सकाळी ९.४५ वाजता स्वत: कार्यालयात दाखल झाल्यानंतर कधी बांधकाम, कधी शिक्षण, तर आराेग्य अशा वेगवेगळ्या विभागांतील हजेरीचे मस्टर अचानक ताब्यात घेतले जाते. यानंतर येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटिसा बजावण्यात येत आहेत. नाेटिसांची मात्रा लेट लतिफांना चांगलीच लागू झाली आहे.
जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ एवढी आहे. मात्र, अनेक अधिकारी तसेच कर्मचारी सकाळी १०, कधी साडेदहा वाजता कार्यालयात येत असत. परंतु, ही बाब यापूर्वी काेणी फारशी गांभीर्याने घेतली गेली नव्हती. पदाधिकारी, जनतेतून ओरड झाल्यास तेवढ्यापुरती कारवाई केली जात असे. त्यामुळे कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या लाेकांना ‘पहिले पाढे पंचावन्न’ या म्हणीचा प्रत्यय येत असे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे राहुल गुप्ता यांनी हाती घेतल्यानंतर लेट लतिफांना चाप लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते स्वत: नियमितपणे सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात येतात. पाच-दहा मिनिटे थांबून आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विभागांची नावे देऊन तेथील हजेरी मस्टर जमा करून आणण्यास सांगतात. सदरील मस्टर ताब्यात घेतल्यानंतर उशिरा आलेल्यांना मस्टरवर स्वाक्षरी करता येत नाही. जे अधिकारी, कर्मचारी उशिरा आलेले असतात, त्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली जाते. आजवर एक-दाेन नव्हे तर जवळपास २५ जणांना ही नाेटीस देण्यात आली आहे. यांतील काहींचे खुलासे प्राप्त झाले असून काहींचे बाकी आहेत. ज्यांचे खुलासे समाधानकारक असतील, ते कारवाईच्या कचाट्यातून वाचतील. मात्र, असमाधानकारक खुलासे असणाऱ्यांविरुद्ध बडगा उगारण्यात येत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या अशा स्वरूपाच्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी, कर्मचारी वेळेच्या आत आपल्या खुर्चीवर विराजमान हाेताहेत. तसेच दिवसभरही चहा अथवा अन्य कारणांसाठी फारशी खुर्ची साेडताना दिसत नाहीत, हे विशेष !
चाैकट...
नियमित हाेते राष्ट्रगीत
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात नियमितपणे राष्ट्रगीत हाेते. त्यामुळे राष्ट्रगीतासाठी जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेपूर्वी हजार असतात.
काेट...
सीईओ पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळा पाळत नसल्याचे समाेर आले. हा प्रकार कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने याेग्य नाही. लेट लतिफांना चाप बसावा, यासाठी मी स्वत: सकाळी ९.४५ पूर्वी कार्यालयात हजर असताे. यानंतर काही मिनिटांनी वेगवेगळ्या विभागांतील हजेरी मस्टर्स जमा केली जातात. यानंतर येणाऱ्याना नाेटिसा बजावण्यात येत आहेत. आजवर २५ जणांना नाेटिसा दिल्या आहेत.
- राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद