मिलेट बार नव्हे, अळ्यांचा बार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; जिल्हा परिषदेने वितरण थांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 07:58 IST2025-07-11T07:57:49+5:302025-07-11T07:58:15+5:30

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट) दिले जातात. मागील दाेन दिवसात पाच शाळांतील लहानग्यांना दिलेल्या बारमध्ये पांढऱ्या अळ्या आढळल्या

Larvae are found in the chocolate-like 'millet bars' provided to students through the Nutritional Food Scheme | मिलेट बार नव्हे, अळ्यांचा बार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; जिल्हा परिषदेने वितरण थांबवले

मिलेट बार नव्हे, अळ्यांचा बार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; जिल्हा परिषदेने वितरण थांबवले

धाराशिव : केंद्र सरकारच्या नीती आयाेगाने धाराशिवचा समावेश मागास जिल्ह्यांच्या (आकांक्षित) यादीत गेला आहे. मागासलेपणाचा हा शिक्का पुसला जावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद तसेच अनुदानित खासगी शाळांतील लहानग्यांना पाेषण आहार याेजनेच्या माध्यमातून चाॅकलेटसारखे ‘मिलेट बार’ पुरविण्यात येत आहेत. मागील दाेन दिवसात पाच शाळांत वाटप करण्यात आलेल्या बारमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्या आहेत. जिल्हा परिषदेने या मिलेट बारचे वितरण थांबवले आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट) दिले जातात. मागील दाेन दिवसात पाच शाळांतील लहानग्यांना दिलेल्या बारमध्ये पांढऱ्या अळ्या आढळल्या. यामध्ये धाराशिव तालुक्यातील पिंपरी, उमरगा तालुक्यातील बलसूर येथील श्री छत्रपती विद्यालय व तुराेरी येथील ज्ञानेश्वर विद्यालयासह येळी येथील शाळांचा समावेश आहे. बारमध्ये अळ्या निघाल्याचे समजताच त्या-त्या शाळेत पालकांनी धाव घेत संताप व्यक्त केला. यानंतर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करून अहवाल सादर केला. त्या आधारे शिक्षण विभागाने पुरवठादार एजन्सीला नाेटीस जारी केली आहे. 

खाण्यायाेग्य कधीपर्यंत?
शाळांना पुरवण्यात आलेले मिलेट बार मार्च २०२५ मध्ये उत्पादित झाले असून, ते सप्टेंबर २०२५ पर्यंत खाण्यायाेग्य आहेत. त्यावर तसा उल्लेखही करण्यात आला आहे. असे असतानाही विहित मुदतीपूर्वीच अळ्या कशा निघाल्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुनिना कंपनीकडून पुरवठा
धाराशिव जिल्ह्यात वितरित मिलेट बार हे गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून उत्पादित केले. कंपनी मूळची मुंबईतील असून, हे बार त्यांच्या जळगाव येथील कारखान्यातून उत्पादित झाले. त्याची मुदत सप्टेंबर महिन्यात संपते. तत्पूर्वीच बारमध्ये अळ्या आढळल्या.

पाच प्रकारचे बार वितरित
‘गुनिना’चे ५ प्रकारचे मिलेट बार विद्यार्थ्यांसाठी वितरित करण्यात आले. यामध्ये ज्वारी, बाजरी, शेंगदाणे, लोणी, सोया, दूध, गूळ असे विविध घटकांच्या मिश्रणातून बार तयार केले जातात. 

या प्रकाराची माहिती शिक्षण सचिवांना दिली आहे. त्यांनी सविस्तर अहवाल मागवला असून, शुक्रवारीच अहवाल सादर करणार आहोत. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये, यासाठी पुढील आदेशापर्यंत मिलेट बारचे वितरण थांबवले आहे. तसेच पुरवठादाराला नोटीसही बजावली आहे. - डॉ. मैनाक घोष, सीईओ, 
जिल्हा परिषद, धाराशिव

Web Title: Larvae are found in the chocolate-like 'millet bars' provided to students through the Nutritional Food Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.