चौपदरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:15+5:302021-09-22T04:36:15+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून गेलेल्या औरंगाबाद -सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर चौपदरीकरण केलेल्या रस्त्यापैकी औरंगाबादकडे ...

चौपदरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून गेलेल्या औरंगाबाद -सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर चौपदरीकरण केलेल्या रस्त्यापैकी औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यातून अपघाताचा धोका वाढला असताना संबंधित कंत्राटदार कंपनीचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव हे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. या गावाच्या व जिल्ह्याच्या सीमेवर औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात वाहने आदळून गेल्याने कित्येक वाहनाचे नुकसान झाले आहे. हा रस्ता तयार करतेवेळी एन. एच. आय. व आय. आर. बी. ने जुना रस्ता पूर्णपणे न उखडता काम केले होते. त्यावेळी स्थानिकांनी याबाबत विचारणाही केली होती. मात्र, याकडे कानाडोळा करत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आता जेवढ्या अंतरात जुना रस्ता न उखडता नवीन रस्ता तयार केला तेवढ्या पट्ट्यातील रस्ता दबला गेला असून, त्याभोवती मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. वाहनधारकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत असून, याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे.