तहसीलसमोर ‘लाल चिखल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:29+5:302021-09-26T04:35:29+5:30

परंडा : टोमॅटोच्या घसरलेल्या दरामुळे लागवडीपासून वाढीपर्यंत झालेला खर्च देखील हातात पडत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शासनाचे लक्ष वेधून ...

'Lal Chikhal' in front of tehsil | तहसीलसमोर ‘लाल चिखल’

तहसीलसमोर ‘लाल चिखल’

परंडा : टोमॅटोच्या घसरलेल्या दरामुळे लागवडीपासून वाढीपर्यंत झालेला खर्च देखील हातात पडत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तहसील कार्यालयाच्या दारातच टोमॅटो फेकल्याची घटना परंडा शहरात घडली.

टोमॅटोचे उत्पादन वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत. बाजारात व्यापाऱ्यांकडून केवळ तीन-चार रुपये किलो दराने टोमॅटोची खरेदी केली जात आहे. यातून मेहनतीसह झालेला व इतर खर्चदेखील हाती पडत नाही. शुक्रवारी आसाच काहीसा प्रसंग वाल्हा येथील शेतकरी शेषेराव भोरे यांच्या नशिबी आला. शुक्रवारी टोमॅटोने भरलेला टेम्पो घेऊन ते परंड्यांच्या बाजारपेठेत आले. येथे व्यापाऱ्याकडून योग्य दर मिळत नसल्याने त्यांनी पुढे माढा तालुक्यातील कुर्डवाडीची बाजारपेठ गाठली. तेथे तर परंड्यापेक्षा वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. व्यापाऱ्यांनी सांगितलेला दर पाहता टेम्पोचे भाढे देखील निघणे मुश्कील झाले. यामुळे त्यांनी आपला टेम्पो पुन्हा परंड्यांच्या दिशेने वळवला. परंड्यांत आल्यानतंर त्यांनी थेट तहसील कार्यालयात टेम्पो घुसवला. रात्री साडेदहाच्या सुमारास या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी टेम्पोतील सर्व टोमॅटो तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फेकून शासनाचा निषेध केला.

चौकट.....

केवळ तीन रुपये दर

टोमॅटोचा पंचवीस किलोचा कॅरेट ८० रुपये दराने विकला जात आहे. एका कॅरेटमध्ये २५ किलो टोमॅटो बसतात. तीन रुपये दर अशी आजची स्थिती आहे. वाहतूक करून बाजारपेठेत टोमॅटो नेले तरी पदरमोड करावी लागते. जास्तीचा खर्च होतो म्हणून अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचा सपाटा लावला आहे.

कोट....

चार महिन्यापूर्वी टोमॅटोची बाग करताना पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. टोमॅटोचे दर पडल्यामुळे खर्चही निघत नाही. शुक्रवारी टोमॅटोचा टेम्पो घेऊन परंड्यांच्या बाजारात आलो. कवडीमोल किमतीत टोमॅटो मागीतल्याने कुर्डवार्डीच्या बाजारपेठेत गेलो. त्या ठिकाणी तर परंड्यापेक्षाही वाईट अनुभव आला. शेवटी शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी तहसील कायालयाच्या दारात टोमाटे फेकून दिले. शासनाने हमीभाव जाहीर करून त्यासोबतच शेतमाल खरेदीची तरतूद करावी.

- शेषेराव भोरे, शेतकरी, वाल्हा (ता.भूम )

250921\psx_20210925_154010.jpg

वाल्हा येथिल  शेतकऱ्याने टोमॅटोला भाव नसल्यामुळे रात्री साडे दहा वाजता टोमॅटो तहसील कार्यालयासमोर फेकून दिले.

Web Title: 'Lal Chikhal' in front of tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.