वर्षभर विनासुटी चालते खोसे गुरुजींची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:36+5:302021-09-05T04:36:36+5:30
उमरगा तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. तालुक्यातील भारत शिक्षण संस्था व श्रीकृष्ण शिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व ...

वर्षभर विनासुटी चालते खोसे गुरुजींची शाळा
उमरगा तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. तालुक्यातील भारत शिक्षण संस्था व श्रीकृष्ण शिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून निजाम राजवटीतही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रप्रेम व शिक्षणासाठी प्रयत्नरत राहिल्या. शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून आपली ओळख जपण्यात उमरगा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. आता यंदा कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर येथे कार्यरत असलेले शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांच्या कर्तृत्वास राष्ट्रपती पुरस्काराची सुवर्णकिनार लाभल्याने उमरग्याचे नाव आणखीच उंचीवर पोहोचले. उमेश खोसे यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर साधी मोबाईलला रेंज नव्हती आशा तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिकता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे यासाठी ५१ ऑफलाईन ॲपची निर्मिती केली आहे. तसेच मुलांच्याच साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोलीभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या बंजारा बोलीभाषेत पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. खोसे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहेत. त्यांची ५ पुस्तके व ४७ लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा या केंद्र शासनाच्या ॲपवर ई-कंटेंट तयार केले आहेत. खोसे व त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर या नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी दिलेले योगदान, तसेच ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून लोकवाट्यातून त्यांनी शाळा डिजिटल बनविल्या. टॅब स्कूल या उपक्रमातून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले आहेत.
निकाल लावला ऑनलाईनच...
कोरोनाच्या काळात त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन ३६५ दिवस सुरू आहे. मुले दीक्षा ॲप तसेच इतर साधनाच्या साहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. अशा काळात त्यांनी शाळेची स्वतः ची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी-बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला आहे. ऑनलाईन निकाल लावणारी कडदोरा ही जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे.