पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:28+5:302021-07-03T04:21:28+5:30

पंधरा दिवसांपासून पाऊस गायब : मुरूम मंडळातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरूम मंडळात आतापर्यंत जवळपास ९० ...

Kharif crops in danger due to lack of rains | पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

पंधरा दिवसांपासून पाऊस गायब : मुरूम मंडळातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे

मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरूम मंडळात आतापर्यंत जवळपास ९० टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरणी पूर्ण झाली. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपातील पिके पावसाअभावी कोमेजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या मंडळात ३९ गावांचा समावेश असून, मे अखेरीस रोहिणी व जूनच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाच्या ओलीवर परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी पूर्ण केली. या हंगामात सर्वाधिक १६ हजार १५० हेक्टरवर सोयाबीन, ६ हजार ९५० हेक्टरवर तूर, ४ हजार ८२० हेक्टरवर उडीद तर १ हजार ६५० हेक्टरवर मूग आणि २ हजार ४५० हेक्टरवर उसाची लागण झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे होत्याचे नव्हते केले होते. शेकडो शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले उडीद, मूग, सोयाबीन पावसात भिजून नुकसान झाले होते. शिवाय वांझोट्या सोयाबीन बियाणामुळे मुरूम मंडळातील ४६० शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. मात्र, यंदा पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्या वेळेवर होऊ शकल्या. त्यामुळे सद्य:स्थितीत पिकांची उगवणही चांगली झाली आहे. असे असतानाच मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतीत झाला आहे.

चौकट.......

उसाचे क्षेत्र वाढले

तालुक्यातील मुरूम मंडळात ३९ गावांचा समावेश असून, ३५ हजार ५०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. गतवर्षी वर्षी ३० हजार ८८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा खरिपाचे क्षेत्र काही प्रमाणात घटले आहे. मागच्या वर्षी १६ हजार ३८३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा ३३३ हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. तर तुरीचे २९०, उडदाचे २४० हेक्टरने पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. या मुख्य खरीप पिकांचे क्षेत्र घटून ऊसाचे क्षेत्र या वर्षी मोठ्याप्रमाणात वाढले असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय सूर्यफुल ८५, कारळ ६५, भुईमूग १४५, बाजरी ६५०, मका ४६७ आणि इतर पिके १ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर आहेत. सध्या खरिपातील उडीद, तूर, सोयाबीन, मुग ही मुख्य पिके जोमात असली पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे.

कोट..........

मुरूम मंडळात ३९ गावे असून, मंडळातील जवळपास ९० टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील वर्षी ३० हजार ८८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा मंडळात उसाचे क्षेत्रही वाढले आहे. एकूण क्षेत्रापैकी सर्वाधिक १६ हजार १५० हेक्टरवर सोयाबीन, ७ हजार हेक्टरवर तूर तर ४ हजार ८२० हेक्टरवर उडीद आणि २ हजार ४५० हेक्टरवर ऊस तसेच १ हजार ६५० हेक्टरवर मुगाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे.

- श्याम खंडागळे मंडळ कृषी अधिकारी, मुरूम

फोटो ओळी

मुरूम मंडळातील केसरजवळगा शिवारात खरिपातील उडदाचे पीक जोमात आले आहे. मात्र पाऊस नसल्याने दुपारच्या वेळी पीक कोमेजून जात आहे.

Web Title: Kharif crops in danger due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.