मुळज येथील हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST2021-01-18T04:29:17+5:302021-01-18T04:29:17+5:30
उमरगा: तालुक्यातील मुळज येथील हनुमान मंदिराचा कळसारोहण सोहळा शनिवारी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर ...

मुळज येथील हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात
उमरगा: तालुक्यातील मुळज येथील हनुमान मंदिराचा कळसारोहण सोहळा शनिवारी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समीतीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
मुळज येथे दक्षिणमुखी पुरातन हनुमान मंदिर असून, या मंदिराला शिखर व कलश नव्हते. त्यामुळे ग्रामस्थ आणि माहेर असलेल्या गावातील मुली, लेक मातांच्या देणगीतून ४१ फूट उंच वेगवेगळ्या देवी देवतांची मूर्ती साकारून येथे शिखर बांधकाम करण्यात आले. या शिखरावर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी पंचधातूचा दिलेला ५१ किलो वजन व चार ते पाच फूट उंचीचा कलश बसविण्यात आला.
तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक रांगोळी काढून टाळ, मृदंग, बॅन्ड, ढोल, ताशा व फटाक्यांच्या आतषबाजीत कलश मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी सकाळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत, महंत वामनगीर महाराज, महंत अवधूत पुरी महाराज, महंत आशुतोष महाराज यांच्या हस्ते तर वेदमूर्ती अशोक जोशी, गोपाळ जोशी, केतन जोशी, केदार जोशी आदींच्या पौरोहित्याखाली कलशारोहण करण्यात आले. यावेळी श्रीगोंदा येथील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, अहमदनगर जि. प. च्या माजी सभापती अनुराधा नागवडे, माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, माजी सभापती अभय चालुक्य, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट...
अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
यावेळी ४१ व्या ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमासह पहाटे काकडा आरती, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, नामवंत महाराजांची कीर्तन सेवा पार पडणार आहे. तसेच २२ जानेवारी रोजी सकाळी पैठण येथील एकनाथ महाराज यांचे वंशज पुष्कर महाराज गोसावी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.
महाप्रसादाचे वाटप
शनिवारी हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. कलशारोहण सोहळ्यानंतर भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य यांच्या वतीने गाव परिसरातील अबालवृद्ध, महिला व हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिगंबर बिराजदार, सतीश जाधव, कमलाकर चव्हाण, कमलाकर मुळे महाराज, रघुनाथ मुळजे, विजय चव्हाण, संजय रेड्डी, अर्जुन बिराजदार आदींसह कर्नाटक, तेलंगणा व परिसरातील तुरोरी, कराळी, कुन्हाली, त्रिकोळी, कदमापूर, आष्टा जहागिर, तलमोड, मळगी, कोरेगाव, चिंचोली येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.