काेराेना संकटातही कळंब पालिकेला मिळेना नियमित ‘सीओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:33 IST2021-04-24T04:33:22+5:302021-04-24T04:33:22+5:30

कळंब -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहराचा कारभार हाकणाऱ्या नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध होत ...

Kalamb Municipality does not get regular 'CO' even in Kareena crisis | काेराेना संकटातही कळंब पालिकेला मिळेना नियमित ‘सीओ’

काेराेना संकटातही कळंब पालिकेला मिळेना नियमित ‘सीओ’

कळंब -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहराचा कारभार हाकणाऱ्या नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांनी यंत्रणा कामाला लावली असली तरी मर्यादा येत आहेत. तसेच काही कामांना ब्रेकही लागत आहे.

कळंब येथील मुख्याधिकारी देविदास जाधव यांची काही महिन्यापूर्वी बढती मिळाल्याने बदली झाली होती. त्यानंतर कळंब पालिका मुख्याधिकारी पदाचा कार्यभार तुळजापूरचे मुख्याधिकारी आशीष लोकरे यांच्याकडे सोपाविण्यात आला. तुळजापूर पालिकेचा कामाचा व्याप माेठा आहे. तेथे तुळजाभवानी मंदिर असल्याने पालिकेवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी लोकरे यांना कळंबच्या पालिकेच्या कामासाठी जास्त वेळ देणे शक्य होत नाही.

यातूनही मार्ग काढत लोकरे यांनी कळंबचा कारभार नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्याशी समन्वय राखत सांभाळला. मात्र कळंब शहराचा मोठा विस्तार असल्याने येथेही पूर्णवेळ मुख्याधिकारी असणे आवश्यक आहे. त्यातच आता कोरोना संसर्गाने शहरात चांगलेच हातपाय पसरले आहेत. काहींचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्याशी संवाद साधण्याचा महत्वाचा दुवा म्हणून मुख्याधिकारी पूर्णवेळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. काही प्रशासकीय निर्णयही केवळ मुख्याधिकारी घेऊ शकतात. तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांचे मूल्यमापन करण्याचा अधिकारही त्यांचा असल्याने कारभार सुरळीत चालू शकतो.

या सर्व बाबी लक्षात घेऊन कळंब न प ला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी आता पुढे येते आहे.

चौकट -

पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावेत यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत. सध्या कोरोना संसर्गाची परिस्थिती सर्वत्र गंभीर आहे. शहरात रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या परीने यंत्रणा कार्यरत ठेवत आहोत. पण काही निर्णय हे मुख्याधिकारी स्तरावर घ्यावे लागतात. त्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावेत अशी आमची मागणी आहे.

सुवर्णा मुंडे, नगराध्यक्ष, नगर परिषद, कळंब.

मागील महिन्यात आम्ही मुंबई येथे जाऊन याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. मुख्याधिकारी नियुक्तीची फाईल संबंधित मंत्रीमहोदयांकडे गेली आहे. त्यावर स्वाक्षरी झाली की नियमित मुख्याधिकारी मिळतील.

संजय मुंदडा, उपनगराध्यक्ष, कळंब.

Web Title: Kalamb Municipality does not get regular 'CO' even in Kareena crisis