कोरोना असेपर्यंतच नोकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:29+5:302021-03-06T04:30:29+5:30
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. जून-जुलै महिन्यापासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला होता. रुग्ण ...

कोरोना असेपर्यंतच नोकरी!
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. जून-जुलै महिन्यापासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला होता. रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचाही ताण वाढला होता. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर डाॅक्टर्स, परिचारिका, अधिपरिचारिका, लॅब टेक्निशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी पदे भरण्यात आले. हे कर्मचारी डेडिकेटेड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर वरील रुग्णांच्या सेवेत असत. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले. त्यामुळे कोविड केअर सेंटर्सही बंद करण्यात आले. परिणामी बहुतांश कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी या केंद्रावर काम करण्यासाठी कंत्राटी कामगारांना पुन्हा तीन महिन्यांसाठी घेण्याची शक्यता आहे. मात्र ही नोकरी कोरोना संपेपर्यंतच असणार आहे. दर तीन महिन्याला मुदतवाढ देण्याऐवजी त्याचा कालावधी ११ महिने करण्यात यावा, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
चौकट...
जिल्ह्यात डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा एकूण ३३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची गतवर्षी ३ महिन्यांसाठी नियुक्ती केली होती. रुग्ण संख्या कमी झाल्याने यातील २०४ जणांना मुदतवाढ देण्यात आली होती. उर्वरित कर्मचाऱ्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे.
प्रतिक्रिया...
कोरोना काळात लॅब टेक्निशियन म्हणून तीन महिन्यांसाठी कंत्राटी कामगार म्हणून आरोग्य विभागाने कामावर घेतले होते. रुग्ण कमी झाल्याने कामावरून
कार्यमुक्त केले. कोविड कर्मचाऱ्यांना तीन महिन्याच्या ऑर्डर न देता ११ महिन्याच्या ऑर्डर देण्यात याव्या.
-दिलीप लांडगे,
कोविड कर्मचारी
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने गतवर्षी कोविड केअर सेंटरमध्ये परिचारिका या पदावर रुजू करून घेण्यात आले होते. रुग्ण कमी झाल्याने कार्यमुक्त करण्यात आले. कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे.
-अरूणा गोलांडे, परिचारिका
कोविड कर्मचाऱ्यांना एनआरएचएम मधून ११ महिन्याच्या ऑर्डर मिळणे गरजेचे आहे. तसेच कोरोना संपुष्टात येताच कोविड कर्मचाऱ्यांना नॉन कोविड मध्ये भरती करून त्यांच्या ऑर्डर पुढे चालू ठेवाव्यात.
अजित कसबे,
वॉर्डबॉय