पोटभाडेकरू देणे पडणार महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST2021-02-12T04:30:48+5:302021-02-12T04:30:48+5:30

कळंब : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागांवर पोटभाडेकरू ठेवून भाडेवसुली करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची प्रक्रिया बाजार ...

It will be expensive to pay the sub-tenant | पोटभाडेकरू देणे पडणार महागात

पोटभाडेकरू देणे पडणार महागात

कळंब : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागांवर पोटभाडेकरू ठेवून भाडेवसुली करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासन हाती घेणार आहे. असा उद्योग करणाऱ्या जागाधारकांचा सर्व्हे समितीने सुरू केल्याची माहिती आहे. कळंब शहराच्या मध्यवर्ती भागात बाजार समितीची जागा आहे. याठिकाणी सध्या जमिनीचे दर मोठे आहेत. कळंब बाजार समिती जिल्ह्यात सर्वात मोठी उलाढाल असणारी समिती आहे. त्यामुळे या परिसरात अनेक लहान मोठे उद्योग चालतात. परिणामी, या भागातील जागांना मोठी मागणी आहे. काही जणांनी बाजार समिती भागात व्यापारी म्हणून बाजार समितीकडून भूखंड भाडेतत्त्वावर घेतले आहेत. परंतु, ते त्याचा वापर कृषिपूरक उद्योगांना न करता इतर उद्योग, व्यापार तसेच इतरांना पोटभाडेकरू ठेवून समितीच्या उद्देशांना हरताळ फासत असल्याचे समोर आले होते.

बाजार समितीचे नियोजन लोकनिर्वाचित संचालक मंडळाकडे असते. त्यामुळे ते लोकांचा किंवा व्यापाऱ्यांचा रोष अंगावर येऊ नये म्हणून अशा बाबींकडे गांभीर्याने पाहत नाहीत. परिणामी नियम डावलून जागेचा वापर करणाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे असते. सध्या कळंब बाजार समितीवर प्रशासक म्हणून कळंबचे सहाय्यक निबंधक कटकधोंड हे कारभार पाहत आहेत. त्यांनी आता बाजार समितीची जागा पोटभाडेकरू ठेवून पैसे कमावणाऱ्यांवर कार्यवाहीचे पाऊल उचलले आहे. जे भूखंडधारक त्यांना दिलेल्या जागेचा वापर स्वतः न करता इतरांना भाडेकरू ठेवून नियमबाह्य जागा वापर करीत आहेत, अशांचा सर्व्हे करण्याची सूचना त्यांनी बाजार समिती प्रशासनाला केली आहे. अशांची यादी करून सादर करा तसेच त्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही कटकधोंड यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता तापण्याची चिन्हे आहेत.

चौकट -

लाखोंचा महसूल, कोटींची मालमत्ता

बाजार समिती परिसरात हजारांच्या घरात व्यापारी लहान, मोठे उद्योग, व्यापार करतात. त्यातून लाखों रुपयांचा महसूल बाजार समितीला मिळतो. समिती परिसरात कोणी कोणताही उद्योग केला तरी बाजार समितीला त्यांचा महसूल ठरवून दिला तेवढाच मिळणार आहे. मग प्रशासक हा सर्व्हे, पोटभाडेकरू माहिती संकलन हा ‘उद्योग’ का करीत आहे, असा संतप्त सवाल व्यापारी वर्गातून विचारला जात आहे. बाजार समिती परिसरातील रस्ते, नाल्या, अतिक्रमण हटविणे तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची कामे बाकी असताना प्रशासकांचा प्राधान्यक्रम नेमका कशामुळे बदलला, असा सवालही व्यक्त केला जात आहे.

चौकट -

प्रशासक मंडळाचाही सस्पेन्स!

कळंब बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे समितीवर शासनाने प्रशासक नेमले आहेत. परंतु, मागील संचालक मंडळातील काही जण नवीन संचालक मंडळ निवडीपर्यंत मुदतवाढ द्यावी म्हणून न्यायालयात गेले आहेत. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. येथे प्रशासक मंडळ नियुक्त करावे म्हणून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे प्रशासक राहणार की प्रशासक मंडळ येणार की जुन्याच संचालक मंडळाला मुदतवाढ़ मिळणार याचा सस्पेन्स कायम आहे.

कोट..........

बाजार समितीची जागा करारावर घेऊन त्यावर पोटभाडेकरू ठेवणाऱ्यांचा सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर अशा मंडळींवर कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेऊ.

- कटकधोंड, प्रशासक तथा सहाय्यक निबंधक

Web Title: It will be expensive to pay the sub-tenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.