शिवरायांच्या पुतळा चबुतऱ्याचा प्रश्न पोहोचला जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST2021-06-10T04:22:36+5:302021-06-10T04:22:36+5:30
(फोटो : बालाजी आडसूळ ०९) कळंब : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवावी, या मागणीकडे ...

शिवरायांच्या पुतळा चबुतऱ्याचा प्रश्न पोहोचला जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात
(फोटो : बालाजी आडसूळ ०९)
कळंब : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवावी, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कळंब येथील विविध पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
‘विदर्भ टू पश्चिम महाराष्ट्र व्हाया मराठवाडा’ असा मार्गक्रमण करणारा खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसराला स्पर्श करत जात आहे. यातील संलग्न लांबीचा भाग असलेल्या कळंब शहरातील रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एका बाजूने रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. याशिवाय कळंब-ढोकी या हायब्रिड ॲन्युईटी अंतर्गत करण्यात आलेल्या रस्ता कामाचा आरंभबिंदूही याच चौकात येतो. या रस्त्याचेही दुतर्फा सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. एकूणच चौकात येणारे परळी, बार्शी व ढोकी या तिन्ही प्रमुख रस्त्याचे खोदकाम, भराई, दबाई व सिमेंट कॉंक्रिटीकरण असे काम होत असल्याने रस्त्याची उंची वाढत आहे.
यामुळे दोन्ही रस्ता कामे पूर्णत्वास आल्यानंतर रस्त्याची उंची वाढणार, हे निश्चित. त्यामुळे पुतळा परिसर खुजा दिसण्याची शक्यता शिवप्रेमींना सतावत आहे. यातूनच शहराचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवावी, त्यास सुशोभिकरण करावे, अशी मागणी पुढे आली होती. यासंदर्भात मागच्या पंधरा दिवसांपूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांशी शिवप्रेमींची चर्चा झाली होती. त्यांनी यासंबंधीचा चेंडू दुसऱ्याकडे टोलवत ‘तुम्ही परवानगी आणा, आम्ही पुढचं पाहू’ असा सल्ला दिला. यानंतर कंपनीने काम पुढे चालूच ठेवले. आता चौकातील एका बाजूचे काम पूर्ण झाल्यामुळे कळंबकरांनी या विषयावर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निवासी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंबंधी चर्चा केली. कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा चबुतऱ्याची उंची वाढवावी ,ही कळंबकरांची जनभावना आहे. सकल शिवप्रेमीही यासाठी आग्रही आहेत. या संवेदनशील विषयावर वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी यात लक्ष घालून उंची वाढवण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली.
चौकट...
शिष्टमंडळात होता यांचा समावेश
बुधवारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी जिल्हाधिकारी यांची शिवप्रेमींनी भेट घेऊन कळंबकरांच्या जनभावना मांडल्या. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, कळंब उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, जलमंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजीत काळे, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, ॲड. तानाजी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस, प्राचार्य जगदीश गवळी, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, हर्षद अंबुरे, अमोल मोरे, लहुराज अष्टेकर, बालाजी नाईकनवरे, विशाल भोरे, स्वप्निल बरकसे, निखिल अंधारे, उत्रेश्वर चोंदे, शिवदास पवार, मुकूंद शेळके, ज्ञानेश्वर भोरे, रणजित पवार, सुनील पवार, सनी कांबळे, अभिजित कदम, नीलेश जगताप आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
डीपीआर करताना विसर कसा पडला?
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना जागोजागी आडवे येणारे नदी, नाल्यांचे प्रवाह, सार्वजनिक ठिकाणे, चौक, जोडरस्ते, गावे, शहरे यांचा विचार करून आवश्यक त्या बाबी कामात अंतर्भूत केल्या आहेत. हे सर्व ‘डीपीआर’ नुसार केले जात आहे, असे सांगितले जाते. असे असताना कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा परिसर ‘डीपीआर’ करताना नजरेआड कसा केला, असा सवाल कळंबकर उपस्थित करत आहेत.