घरकूल लाभार्थ्यांना बांधकाम परवाने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:09+5:302021-07-03T04:21:09+5:30
लोहारा : शहरातील प्रधान मंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तातडीने बांधकाम परवाने देऊन त्यासाठी ठेवण्यात आलेली खरेदीखताची जाचक अट ...

घरकूल लाभार्थ्यांना बांधकाम परवाने द्या
लोहारा : शहरातील प्रधान मंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तातडीने बांधकाम परवाने देऊन त्यासाठी ठेवण्यात आलेली खरेदीखताची जाचक अट रद्द करावी. शासन धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मुबलक दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, शहरात प्रधानमंत्री आवास योजनेतून दुसऱ्या टप्प्यामध्ये २०० घरकुले मंजूर झाली आहेत. या लोकांना पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर बांधकाम परवाने देणे उचित असताना अद्यापही ते मिळालेले नाहीत. पात्र लाभार्थ्यांकडे शपथपत्र, संमतीपत्र व वारसा आधारे मालकी हक्काचे दस्तावेज, नमुना नं. ८ ‘अ’ला घेण्यात आलेली नोंद उपलब्ध आहे. परंतु, ८ ‘अ’ सोबत मुख्याधिकारी व प्रधान मंत्री आवास योजना विभागातील कर्मचारी हे जागेच्या खरेदी खताची मागणी करीत आहेत. खरेदी खत नसल्यामुळे घर बांधण्याची प्रक्रिया नगर पंचायतीकडून स्थगित ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लाभार्थ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर अध्यक्ष आयुब शेख यांनी या निवेदनात केला आहे. या वेळी बाळासाहेब लांडगे, हरी लोखंडे, बिजाज चाऊस आदी उपस्थित होते.