बेजबाबदार ग्रामस्थांमुळे गुंजाेटी हाेतेय हाॅट स्पाॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:33 IST2021-04-24T04:33:27+5:302021-04-24T04:33:27+5:30

उमरगा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून मृत्यूंची संख्याही मोठ्या प्रमाणात ...

Irresponsible villagers cause hot spots in Gunjati | बेजबाबदार ग्रामस्थांमुळे गुंजाेटी हाेतेय हाॅट स्पाॅट

बेजबाबदार ग्रामस्थांमुळे गुंजाेटी हाेतेय हाॅट स्पाॅट

उमरगा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून मृत्यूंची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुंजोटी गावात मागील आठवड्यात कोरोना प्रार्दुभावामुळे गावातील तिघांचा मृत्यू झाला; तर आजघडीला २२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. असे असतानाही बहुतांश ग्रामस्थ नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. ग्रामस्थांच्या या बेजबाबदारपणामुळे गुंजाेटी काेराेना हाॅट स्पाॅट होऊ लागले आहे.

उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय आहे. मात्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदी व सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन केले जात असून गावातील विविध ठिकाणी काही ठरावीक नागरिक मुक्त संचार करीत असून सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसून गप्पा मारत असल्याचे चित्र आहे. सर्वत्र संचारबंदी केलेली असतानादेखील गावातील अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर नागरिक मुक्तपणे फिरत आहेत. तरुण मुले एकत्र येत मोबाईलवरील लुडोसारखे खेळ खेळत आहेत. सोशल डिस्टन्स न ठेवता नागरिक बिनधास्तपणे चौकाचौकांत जमा होत एकत्र बसत मोबाईलवर चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, गप्पा मारणे आशा प्रकारचे वर्तन करीत आहेत. ग्रामीण भागात शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. चावडी, वेशीवर संचारबंदीचे नियम टांगले जात आहेत. मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद सारख्या शहरांतून गावाकडे परतलेले नागरिक परिस्थिती गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. गुंजोटी गाव मोठे असून येथील लोकसंख्याही जास्त आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात फक्त दोनच पोलीस असल्याने त्यांच्यावरही ताण पडत आहे. दरम्यान, संचारबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने अधिक पुढाकार घेण्याची गरज व्यक्त हाेऊ लागली आहे.

चाैकट...

महाराष्ट्रात गुटखविक्रीस बंदी घातली असली तरी जवळच्या कर्नाटक राज्यातून आणून छुप्या पद्धतीने गावात मोठ्याप्रमाणात गुटखा विक्री सुरू असून सुपारी, पान, गुटखा खाण्यासाठी काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी पानटपरीवर, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला मनाई असून अशी दुकाने बंद करण्यात आली आहेत. मात्र दुकानदार छुप्या पद्धतीने पार्सल पोहोच करत असल्याने सार्वजनिक ठिकाणी गुटखा चघळत, गप्पा मारत नागरिक मुक्तपणे संचार करत आहेत.

Web Title: Irresponsible villagers cause hot spots in Gunjati