तुळजापुरातील 'त्या' जागांचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:46+5:302021-09-18T04:35:46+5:30

उस्मानाबाद : तुळजापुरातील तीर्थकुंड हडप प्रकरणातील आरोपी देवानंद रोचकरी यांच्यामागे आता आणखी नवे शुक्लकाष्ठ लागले आहे. शहरातील आणखी दोन ...

Inquiry into 'those' places in Tuljapur | तुळजापुरातील 'त्या' जागांचीही चौकशी

तुळजापुरातील 'त्या' जागांचीही चौकशी

उस्मानाबाद : तुळजापुरातील तीर्थकुंड हडप प्रकरणातील आरोपी देवानंद रोचकरी यांच्यामागे आता आणखी नवे शुक्लकाष्ठ लागले आहे. शहरातील आणखी दोन मोक्याच्या जागा हडपल्याची तक्रार असल्याने त्याचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून गेले आहेत. यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

तुळजापुरातील बडी हस्ती देवानंद रोचकरी यांनी शहरातील मोक्याच्या जागा हडपल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या आहेत. मात्र, मंकावती तीर्थकुंड बनावट कागदपत्रे तयार करून तो आपल्या नावे लावल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही बाब गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर लागलीच रोचकरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात गेल्या महिनाभरापासून रोचकरी बंधू कोठडीत आहेत. आधी तुळजापूर न्यायालयाने आणि नंतर जिल्हा न्यायालयानेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हवाला देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने जिल्हा कारागृहातील रोचकरींचा मुक्काम वाढला आहे. दरम्यान, इकडे कोठडी भोगत असतानाच त्यांच्याबाबत आणखीही तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या. तुळजापुरातील जुन्या बसस्थानकासमोरील महसूलची मोक्याची जागा ताब्यात घेऊन तेथे कॉम्प्लेक्स उभे केल्याचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मोक्याची जागाही रोचकरींनी कब्जा केल्याची तक्रार करण्यात आली. त्याआधारे आता जिल्हाधिकारी कार्यालयाने या जागांचे हस्तांतर कसे झाले, हे मुळापासून शोधून काढण्यासाठी चौकशी लावली आहे. यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून, त्यांना लवकर चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यास सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच तीर्थकुंड प्रकरणात बेजार झालेल्या रोचकरींच्या मागे प्रशासनाने नवे शुक्लकाष्ठ लावून बेजारीत भर घातली आहे.

Web Title: Inquiry into 'those' places in Tuljapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.