उशिराने पेर झालेल्या खरीप पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST2021-08-25T04:37:35+5:302021-08-25T04:37:35+5:30
येणेगूर : पावसाची भुरभूर, ढगाळ वातावरण सकाळच्या वेळी पडणारे धुके यामुळे उशिराने पेरणी झालेल्या खरीप पिकांवर विविध रोग व ...

उशिराने पेर झालेल्या खरीप पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव
येणेगूर : पावसाची भुरभूर, ढगाळ वातावरण सकाळच्या वेळी पडणारे धुके यामुळे उशिराने पेरणी झालेल्या खरीप पिकांवर विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
मृग, आर्द्राच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर पुनर्वसु नक्षत्राच्या पावसावर येणेगूर, नळवाडी, दाळींब, सुपतगाव महालिंगरायवाडी, तुगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र, या पिकाची उगवण होताच गोगलगाय व पैसा किडीचा हल्ला झाला. त्यावर शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशकांची फवारणी करून कशीतरी मात केली. त्यानंतर पावसाने तब्बल २५ दिवस दडी मारली. मागील आठवड्यांत थोडासा रिमझिम पाऊस पडला. मात्र, आठवडा ते दहा दिवसाच्या कालावधीत ढगाळ वातावरण, भुरभूर पाऊस व सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे उडीद, मूग या पिकांवर भुरी, बोकडा, मावा रोग तर मक्यावर लष्करी अळी व सोयाबीनवरही खोडकिड व इतर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
अर्थचक्र बिडघले
या कीड, रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महागडी औषधे, वाढलेले मजुरीचे दर यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. अपुऱ्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट येणार, हे माहीत असूनही शेतकरी महागमोलाची औषधे फवारून आपली पिके रोगमुक्त करण्यासाठो धडपड करीत असताना दिसून येत आहेत.
कृषीचा सल्ला...
यासंदर्भात मंडळ अधिकारी खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दमट हवामान व सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे उडीद, मूग, पिकावर भुरी व बोकड्यासह मावा रोग पडतो. त्यासाठी पाण्यात मिसळणारे गंधक, बाविस्टीन व रोगोरची फवारणी करावी व सोयाबिनवरील खोड किड व मक्यावरील लष्करी अळीसाठी कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.