तीव्र वळणामुळे वाढला अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:04+5:302021-04-21T04:32:04+5:30

(फोटो : अजित २०) तुळजापूर : शहरातील उस्मानाबाद रोडपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पालिका वाचनालयासमोर तुळजापूर ...

Increased risk of accidents due to sharp turns | तीव्र वळणामुळे वाढला अपघाताचा धोका

तीव्र वळणामुळे वाढला अपघाताचा धोका

(फोटो : अजित २०)

तुळजापूर : शहरातील उस्मानाबाद रोडपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पालिका वाचनालयासमोर तुळजापूर (खुर्द) मार्गावरील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाने उपाययोजना न केल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुळजापूरहून उस्मानाबाद रोडलगत असलेल्या तुळजापूर (खुर्द) मार्गावरून तडवळा, मोर्डा, धारूर, बामणी (वाडी), केशेगाव, अनसुर्डा, बेंबळी, तेर आदी गावांना याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. याचबरोबर या मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना येथील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी या मार्गावरूनच भाविकांना जावे लागत असल्याने या मार्गावरून सतत वाहने धावतात. तसेच तुळजापूर ते तुळजापूर खुर्द या मार्गावर वसाहत वाढीमुळे, लोकसंख्या वाढीमुळे नागरिकांचीही सतत रेलचेल असते. यामुळेच सहा महिन्यांपूर्वी तुळजापूर-उस्मानाबाद रोड ते तुळजापूर खुर्द या मार्गाचे कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटीकरण केले आहे. मात्र, तुळजापूर-उस्मानाबाद रोडपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर पालिका वाचनालयाच्या समोर धोकादायक वळण असून, या वळणावरच रस्ता अरुंद असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथे दिशादर्शक, तीव्र वळणासंबंधी सूचना फलकदेखील लावण्यात आलेला नाही. यामुळे वाहनचालकांना पुढे धोकादायक वळण असल्याचे लक्षात येत नाही. पादचारी तसेच दुचाकी चालकाला आपला जीव धोक्यात घालून येेथून जावे लागत आहे. त्यामुळे येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोट.............

तुळजापूर (खुर्द) मार्गावरील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. या वळणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच या मार्गावर समोरून येत असलेले वाहन दिसत नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. जमिनीपासून रस्त्याची उंचीदेखील वाढली गेल्याने, एखाद्या वाहन चालकाचा ताबा सुटल्यानंतर ही दुचाकी पडून अपघात होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने येथे तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

- बालाजी जाधव, रहिवासी, शिवरत्न नगर

Web Title: Increased risk of accidents due to sharp turns