नादुरुस्त रस्त्यामुळे भूमकरांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:15+5:302021-09-14T04:38:15+5:30
भूम : शहरात अस्ताव्यस्त पार्किंग, रोडवर वाढलेले अतिक्रमण तसेच मोठ्या पावसामुळे खराब झालेले रस्ते, शहरवासीयांसाठी सध्या मोठी डोकेदुखी ठरत ...

नादुरुस्त रस्त्यामुळे भूमकरांची होतेय गैरसोय
भूम : शहरात अस्ताव्यस्त पार्किंग, रोडवर वाढलेले अतिक्रमण तसेच मोठ्या पावसामुळे खराब झालेले रस्ते, शहरवासीयांसाठी सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांचीदेखील मोठी गैरसोय होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
शहरात गोलाई चौक ते परंडा रोड, वाशी-कुंथलगिरी व पार्डी-उस्मानाबाद रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यावरदेखील जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र आहे. गोलाई चौक ते परंडा रोडवर दुतर्फा मोठी नाली असून, मोठ्या पावसामुळे अनेकवेळा कचऱ्याने नाली तुंबली जाते. नाल्यातील वाळू रस्त्यावर आल्याने वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत. सध्या श्री संत तुकाराम चौकात खड्डे पडले असून, यात पाणी साचल्याने याचा त्रास विशेषत: दुचाकीचालकांना अधिक प्रमाणात सहन करावा लागत आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन या खड्ड्यात जाऊन आदळत आहे. तसेच गोलाई-उस्मानाबाद रोडवर महाविद्यालयानजीक उतारावर रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेले असून, येथे केवळ खडी शिल्लक राहिली आहे. तसेच मेनरोडवरदेखील पावसाने खड्डे पडल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
वाशीरोड हा नेहमीच खड्ड्याचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. सध्या पावसाने हा संपूर्ण रस्ता उखडला असून, रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून चिखल झाल्याने वाहन चालविताना ते स्लिप होत आहेत. या रस्त्याची अनेकदा दुरुस्ती केली जाते. परंतु, दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पुन्हा खराब होतो व पुन्हा रस्ते बुजविण्याचे सोपस्कार केले जातात. अनेकदा रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून जड वाहन गेल्यास नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. अशावेळी वाहनधारक व नागरिकांमध्ये तू-तू, मैं-मैं होते. यासाठी खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
चौकट
एकीकडे दुरवस्था, एकीकडे अतिक्रमण
शहरात गोलाई चौक ते परंडा रोडची एकीकडे दुरवस्था झालेली असता दुसऱ्या बाजूने अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्यालगत अस्ताव्यस्त वाहने लावली जात असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालतानादेखील मोठी कसरत करावी लागते. याच रोडवर भारतीय स्टेट बँक असून, या ठिकाणी सातत्याने वाहनांची वर्दळ असते. शिवाय, बँकेसमोरदेखील अस्ताव्यस्त पार्किंग दिसून येते.
कोट......
शहरातील मेन रोडवर अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांना अगोदर तोंडी समज दिली जाणार आहे. यानंतरही काही सुधारणा नाही झाल्यास नंतर मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी वाहने लावताना काळजी घ्यावी.
- दत्तात्रय सुरवसे, पोलीस निरिक्षक, भूम
भूम शहरात गोलाई चौक ते वाशी रोड, परंडा रोड, पार्डी रोड भागात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या पावसामुळे याच्या दुरुस्तीचे काम शक्य नाही. परंतु, पावसाची उघडीप मिळताच हे सर्व खड्डे भरून घेऊन वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करू.
- एच. सी. मुंडे, उपअभियंता, बांधकाम विभाग